– महापौर संदीप जोशी यांच्या निर्देशाने कारवाई : लक्ष्मीनगर झोनमधील बाजारात केला दौरा
नागपूर : संपूर्ण नागपुरात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली असली तरी अनेक दुकानदार नियमांचे पालन करीत नाही ही बाब लक्षात येताच अशा दुकानदारांवर ‘ऑन स्पॉट’ दंड ठोठावण्याचे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले. यापुढे नियम तोडले तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
महापौर संदीप जोशी यांनी बाजार परिसरातील व्यापारी आणि ग्राहकांनी नियम पाळावे यासाठी लक्ष्मीनगर झोनअंतर्गत असलेल्या बाजारांचा पायी दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने, लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे होते. महापौरांनी माटे चौकातून दौऱ्याला सुरुवात केली. गोपालनगर, प्रतापनगर, खामला, देवनगर आदी भागात फिरून कोव्हिड-१९ संदर्भात शासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले. सम आणि विषम तारखांचा नियम पाळण्याचेही आवाहन केले. मास्कचा वापर करावा, शारीरिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन करीत त्यांनी दुकानदारांना नियमांबाबत माहिती दिली. नियम पाळा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
‘ऑन स्पॉट’ कारवाई
महापौरांच्या या जनजागृती दौऱ्यात गोपालनगर, प्रतापनगर परिसरात काही दुकाने सम-विषम नियमांचे उल्लंघन करताना आढळले. त्या दुकानदारांना ऑन स्पॉट दंड आकारण्याचे महापौरांनी निर्देश दिले. त्यांच्या निर्देशावरून मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दंडाची कारवाई केली.