Published On : Tue, Jul 21st, 2020

नियमांची अंमलबजावणी करा अन्यथा कारवाई

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे रस्त्यावर उतरले : अनेक दुकानदारांवर केली कारवाई

नागपूर : लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली याचा अर्थ नियम पाळायचे नाही असा होत नाही. शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करा. नियम पाळा. अन्यथा मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे सोमवारी (ता. २०) रस्त्यावर उतरले. शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये स्वत: जाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बाजारपेठांचा आकस्मिक दौरा केला. झांशी राणी चौक ते आनंद टॉकीज दरम्यानच्या रस्त्यावरील बाजारामध्ये नियमांचे पालन होत आहे अथवा नाही, याची त्यांनी शहानिशा केली. नियम मोडणाऱ्या दुकानांमध्ये स्वत: जाऊन दुकानदारांची कानउघाडणी केली. ज्या दुकानांतील कर्मचारी अथवा येणारा ग्राहक मास्कचा वापर करताना आढळला नाही, त्यांच्यावरही दंड आकारण्याचे निर्देश दिले. मनपाच्या अधिकाऱ्यांनी अशा नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई केली.

यानंतर बर्डी, कॉटन मार्केट परिसर, सुभाष रोड, चिटणवीस पार्क, शिवाजी पुतळा ते गांधीसागरदरम्यानच्या मार्गावरील बाजारात फिरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या मार्गावर मोठ्या प्रमाणात हॉकर्स फुटपाथवर बसलेले आढळले. हॉकर्सला सध्या दुकान थाटण्याची परवानगी नसतानाही ते कसे काय दुकान थाटून बसले, याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अशा हॉकर्सवरही यावेळी कारवाई करण्यात आली.

वाहनचालकांवरही कारवाई
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत दुचाकी आणि चार चाकीसाठीही नियम आहेत. दुचाकीवर एक आणि चार चाकीमध्ये चालकासहीत तिघांना परवानगी आहे. या नियमांचे ज्या वाहनचालकांनी उल्लंघन केलेले आढळले, अशा वाहनचालकांवरही कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. पोलिसांनी अशा वाहनचालकांवर तात्काळ कारवाई केली.

नियम पाळा अन्यथा कारवाई : आयुक्त तुकाराम मुंढे
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता ही नागरिकांच्या भल्यासाठी आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू राहावे, यासाठी आहे. मात्र, हे करताना शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करणेही आवश्यक आहे. तसे होत नसल्याचे वाढत्या रुग्णसंख्येवरून लक्षात येत आहे. नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे अन्यथा नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

Advertisement
Advertisement