Published On : Thu, May 3rd, 2018

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: इराणींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार

नवी दिल्ली: राजधानीत गुरूवारी होऊ घातलेला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा कलाकारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे वादात सापडला आहे. यंदा या पुरस्कार सोहळ्यात काही विजेत्यांना राष्ट्रपतींच्याऐवजी माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. केवळ 11 पुरस्कार विजेत्यांनाच राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयाला विजेत्या कलाकारांनी विरोध केला आहे. आम्ही राष्ट्रपतींच्याच हस्ते पुरस्कार स्वीकारू, अन्यथा सोहळ्यावर बहिष्कार टाकू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. थोड्याचवेळात यासंबंधी दिल्लीच्या अशोक हॉटेलमध्ये तातडीची बैठक घेतली जाणार आहे. त्यानंतर यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल.

आतापर्यंत दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येत असे. मात्र, यंदा पहिल्यांदाच या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. हा निर्णय ऐनवेळी जाहीर करण्यात आला. कारण, या पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर विजेत्यांना पारितोषिक राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते.

परंतु, चित्रपट महोत्सव विभागाच्या संचालकांकडून विजेत्या कलाकारांना या सोहळ्याच्या रंगीत तालमीसाठी पाचारण करण्यात आले तेव्हा 107 पुरस्कार हे स्मृती इराणींच्या हस्ते दिले जातील, अशी माहिती देण्यात आली. तेव्हा कलाकारांनी याबद्दल नाराजी व्यक्त करायला सुरूवात केली. अनेक कलाकरांनी इराणींकडून पुरस्कार स्वीकारण्यास नकार देत या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. हे प्रकरण चिघळायला लागल्यानंतर स्वत: स्मृती इराणी त्याठिकाणी आल्या होत्या. त्यांना संबंधित कलाकारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात राष्ट्रपती कार्यालयाकडूनच बदल करण्यात आले, असा दावा इराणी यांनी केला. मात्र, तुमच्या भावना मी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवेन, असे आश्वासन त्यावेळी इराणी यांनी दिले होते.