Published On : Mon, Mar 8th, 2021

जागतिक महिला दिनी मजूर महिला कामाच्या प्रतीक्षेत, चावडी चौकात ठिय्या

Advertisement

कामठी :-दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो या दिनाचे महत्व साधून कामठी तालुक्यात विविध कार्यक्षेत्रातील महिलांचा सत्कार करून या दिनाचे महत्व विषद करण्यात येते मात्र याच दिवशी आर्थिक परिस्थितीने बिकट असलेले व मजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मजूर महिलांना जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळील चावडी चौकात दुपारचे बारा वाजूनही कामाच्या प्रतीक्षेत ठिय्या मांडून बसल्याने एकीकडे विविध कार्यक्षेत्रातील सक्षम महिलांचा सत्कार करण्यात आला तर आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेल्या मजूर महिलांना पोटाची खळगी भरण्यासाठी कामाची प्रतीक्षा करीत राहल्याने या मजूर महिलांना आजच्या जागतिक महिला दिनी कमकुवतेची भावना जाणवली.

जगातील सर्व श्रमिकांनी एक व्हा असे काल मार्क्स यांनी सांगितले होते.अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले यांनी सुद्धा श्रमिकांना कामाचा मोबदला मिळावा यासाठी संघर्ष केला मात्र बदलत्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीच्या पाश्वरभूमीवर असंघटित अंगमेहनती ने काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न अजूनही कायम आहेत .एकविसाव्या शतकातील धकाधकीच्या युगात या असंघटित कामगारांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.

कामठी चे जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळील चावडी चौकात शैक्षणिक दृष्ट्या कमी शिकलेले आणो आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले मजूर कामाच्या शोधात तालुक्यातील शहर तसेच नजीकच्या ग्रामीण भागातुन सकाळपासूनच उभे राहतात चावडी चौक हा पोलिस स्टेशन जवळील असल्याने काम मिळेल या आशेने येथे गोळा होतात परंतु बहुतांश मजुरांना दुपारचे बारा वाजेपर्यंत वाट बघूनही काम मिळत नाही व नाईलाजाने त्यांना उलटपायी घरी परतावे लागते. गावंडी, सुतार, राजमिस्त्री, मातीगोट्याचे काम करणारी असे सर्वच मजूर येथे उभे दिसतात.पूर्वी या चौकात आलेल्याना कुठलेही काम मिळायचे मात्र आता परिस्थिती बदललेली आहे.10मजुरांचे काम एक यंत्र करते त्यामुळे मजुरांची संख्या त्या कामावर कमी लागते परिणामी बहुतांश मजुरावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

या चावडी चौकात मजुरांसाठी पिण्याचे पाणी, शौचालयाची व्यवस्था नसल्याने त्या मजुरांना नाहक त्रास भोगावा लागतो .पोटाची खळगी भरण्यासाठी व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याच्या मुख्य जवाबदारीत सहाययभूत ठरलेले या मजूर महिला जेवणाचा डब्बा घेऊन मुलांना घरी एकटे न ठेवता सोबत घेऊन कुणाच्या आडोशाखाली नाहीतर भर उन्हात उभे राहून काम मिळन्याच्या प्रतीक्षेत ठिय्या मांडून असतात दुपार होऊनही काम न मिळाल्याने निराशेने उलटपायी घरी परतावे लागते तेव्हा या मजुरांना नित्यनेमाने काम मिळावे यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी मागणी येथील मजूर महिला वर्ग करीत आहेत

संदीप कांबळे कामठी