Published On : Mon, Mar 8th, 2021

‘रामकथामाला’ नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Advertisement

परकीय राजवटीत भारतातून अनेक लोकांना दूरदेशात मजूर म्हणून नेले गेले तसेच काही लोक अन्यत्र स्थलांतरित झाले. मात्र त्या त्या देशांत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीही आपल्या लोकांनी धर्म व संस्कृती न बदलता रामकथा जपून ठेवली, तसेच रामाचे जीवन, साहित्य व चरित्र आपापल्या पद्धतीने मांडले. जगातील विविध प्रांत व देशांमधील रामकथा कलेच्या माध्यमातून पुढे आणणारे ‘रामकथामाला’ हे पुस्तक माहितीपूर्ण व बोधप्रद असून नव्या पिढीसाठी ते प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले दीपाली पाटवदकर यांनी लिहिलेल्या रामकथामाला या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ८) राजभवन येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

‘राम अनंत रामकथा अनंत’ आहे असे सांगून लोकांच्या पिढ्या जन्मतील आणि कालप्रवाहात जातील, परंतु रामकथा शाश्वत व कालजयी आहे, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.

जागतिक महिला दिनी दीपाली पाटवदकर या महिला लेखिकेने रामकथामाला प्रस्तुत केली आहे त्यामुळे ग्रंथाचे महत्व विशेष आहे. लेखिकेने रामकथा ज्या स्वरूपात मांडली आहे, ते स्वरूप विलोभनीय असून पुस्तक विविध भाषांमध्ये भाषांतरील होईल असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

रामकथामाला या पुस्तकातून वाल्मिकी, कालीदास यांचेपासून गदिमा यांच्या पर्यंत विविध कवींनी लिहिलेली रामकथा आली आहे. लोकसाहित्यातील, वनवासी परंपरेतील आणि लोककलेतील विविध रामकथांचे वर्णन आले आहे. जैन, बुद्ध व शीख साहित्यातील रामकथांची माहिती आली आहे. भारताच्या विविध राज्यातील व बाहेरील देशातील रामयाणांचे वर्णन आले आहे. चित्र, शिल्प, नृत्य व बले नृत्यामधून सादर होणाऱ्या रामयाणांचे वर्णन आले आहे. रामलीला, रम्मण आदी जागतिक सांस्कृतिक वारसा असलेल्या सादरीकरणची माहिती आली आहे. रामकथेचे महत्त्व, त्याचा समाजावर व राष्ट्रावरील प्रभाव या मध्ये सांगितला आहे अशी माहिती लेखिका दीपाली पाटवदकर यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेकानंद केंद्राच्या मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर यांनी केले तर अभय बापट यांनी अभारप्रदर्शन केले.

कार्यक्रमाला कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राचे महासचिव भानुदास, सहसचिव शैलेंद्र बोरकर विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाच्या व्यवस्थापिका वसुधा करंदीकर, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, विश्वास लापालकर, सुजाता दळवी, सुनील कुलकर्णी आदि उपस्थित होते.