Published On : Mon, Oct 5th, 2020

पोलिसांची वकील तरुणीला मारहाण, सहा महिन्यांनंतर व्हायरल झाला व्हिडिओ

Advertisement

त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मास्क लावण्यावरून वाद झाला होता, त्यामुळे अंकिता यांना मारहाण केल्याचे लकडगंज पोलिसांनी सांगितले. मात्र फुटेजमध्ये चक्क पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे विना मास्कचे फिरताना दिसत आहेत, हे विशेष. अंकिता यांनी पोलिस आयुक्तांकडे पीआय हिवरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नागपूर : शहरातील वकील अंकिता शाह या मोकाट कुत्र्यांच्या अधिकारासाठी काम करतात. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मोकाट कुत्र्यांसाठी रस्त्याच्या कडेला मोकाट कुत्र्यांसाठी त्या अन्न व पाणी ठेवत होत्या. त्यावरून उद्भवलेल्या एका वादामुळे त्या लकडगंज पोलिस ठाण्यात गेल्या होत्या. तेथे पोलिसांनी त्यांना मारहाण केली. धक्कादायक म्हणजे माहिती अधिकाराअंतर्गत तब्बल सहा महिन्यांनंतर त्यांना सीसी टीव्ही फुटेज मिळाले. हा व्हिडिओ आज सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता शाह या तुलशी अपार्टमेंट, टेलिफोन एक्सचेंज चौकात राहतात. मोकाट कुत्र्यांच्या अधिकारांसाठी त्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मोकाट कुत्र्यांना अन्न व पाणी देण्याची मोठी समस्या निर्माण झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या कडेला कुत्र्यांसाठी एक पात्र ठेवले. या पात्रात त्या अन्न व पाणी कुत्र्यांना ठेवत होत्या. २४ मार्च २००१ ला दुपारी १ वाजता त्या आपल्या पतीसह कुत्र्यांना अन्न व पाणी देण्यासाठी गेल्या असता इमारतीमध्ये राहणाऱ्या करण सचदेव यांनी पात्राला लाथ मारली.

२५ मार्च २०२० ला संध्याकाळी ७.३० वाजता असाच प्रकार घडल्याने त्या लकडगंज पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्या ठिकाणी पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला. या वादातून पोलिसांनी अंकिता यांना जबरदस्त मारहाण केली. याविरुद्ध त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली. तसेच माहितीच्या अधिकारात पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज मागितले. प्रथम पोलिसांनी त्यांना फुटेज देण्यास नकार दिला. माहितीच्या अधिकारात अपिलामध्ये गेल्यानंतर उपायुक्तांनी फुटेज देण्याचे आदेश दिले. शाह यांना रविवारी हे फुटेज मिळाले. त्यानंतर त्यांनी ते समाजमाध्यमांवर प्रसारित केले असता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.


अंकिता यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपायुक्तांकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे, पोलिस उपनिरीक्षक भावेश कावरे, शिपाई आतीश भाग्यवंत, प्रमोद राठोड, हिरा राठोड, देवीलाल तपे, चेतना बिसेन आणि माधुरी खोब्रागडे यांच्याविरुद्ध तक्रार केली असून त्यांच्यावर भादंविच्या कलम २९४, ३२४, ३३६, ३३७, ३४७, ३४८, ३८९, ३९१, ३९५ आणि ४२७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, अशी माहिती अंकिता यांनी दिली.

त्यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे मास्क लावण्यावरून वाद झाला होता, त्यामुळे अंकिता यांना मारहाण केल्याचे लकडगंज पोलिसांनी सांगितले. मात्र फुटेजमध्ये चक्क पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे विना मास्कचे फिरताना दिसत आहेत, हे विशेष. अंकिता यांनी पोलिस आयुक्तांकडे पीआय हिवरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.