मुलाचा सोशल मीडियावरील मेसेज जीवावर बेतला, वडिलांची घरात घुसून हत्या
नागपूर : नागपूरच्या पांढराबोडी परिसरात एका इसमाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हत्येच्या या घटनेमागे मृतकाच्या मुलाचा सोशल मीडियावर गुन्हेगारी वृत्तीच्या आरोपीसोबत एका मेसेजला घेऊन झालेला वाद कारणीभूत ठरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
अशोक नहारकर (40 वर्ष ) असे मृतकाचे नाव असून रविवारी रात्री अकराच्या सुमारास नहारकर कुटुंबीय झोपण्याच्या तयारित होते. त्यावेळी अचानक त्यांच्या घरावर काही जणांनी दगड, विटा, चाकू आणि लोखंडी रॉड घेऊन हल्ला केला. या हल्ल्यामुळे नहारकर कुटुंबियांमध्ये दहशत निर्माण झाली. काय करावे हे सुचण्याच्या आधीच हल्लेखोर त्यांच्या घराचं दार तोडून आत शिरले आणि त्यांनी रितेश नहारकर (अशोक नहारकर यांचा मुलगा) याच्यावर हल्ला चढवला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी रितेशचे वडील अशोक मधे पडले. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करत चाकू आणि दगडांनी त्यांच्या घराच्या आतच कुटुंबियांच्या देखत हत्या केली.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अशोक नहारकर यांना उचलून कुटुंबियांनी जवळच्या रुग्णालयात धाव घेतली. मात्र, रुग्णालयाच्या दारावर पुन्हा हल्लेखोरांनी हल्ला चढवला. त्यांच्या तावडीतून सुटून रुग्णालयाच्या आत पोहोचेपर्यंत अशोक नहारकर यांचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी या प्रकरणी चेतन महतो, रामू महतो आणि मुन्ना महतो या तीन आरोपींना अटक केली आहे. महतो कुटुंबियांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्या विरोधात गुन्हेगारीचे अनेक गंभीर प्रकरण दाखल आहेत. दरम्यान, या घटनेमागे सोशल मीडियावर तरुणांमध्ये एकमेकांच्या विरोधातली शेरेबाजी आणि दादागिरीच्या उद्दिष्टाने एकमेकांना पाहून घेण्याची धमकी देण्याचे कारण असल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील एका तरुणाचे मेसेज आणि त्यावरून गुंड वृत्तीच्या आरोपींसोबत झालेले भांडण वडिलांच्या जीवावर बेतले आहे.