नाशिक : भारत-पाक सीमेवर पाक सैनिकांच्या गोळीबारात वीरमरण आलेले सिन्नर तालुक्यात शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील जवान नाईक केशव गोसावी यांचे पार्थिव वायुसेनेच्या विशेष विमानाने ओझर येथे आणण्यात आले. पालकमंत्री गिरीष महाजन यांनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय सैनिक या घटनेला चोख प्रत्युत्तर देतील असा विश्वास व्यक्त करून श्री.महाजन यांनी शहीद जवानाच्या कुटुंबियांना मदत देण्याविषयी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करण्यात आली असून राज्य शासनातर्फे 25 लाखाची मदत देण्यात येईल, असे सांगितले.
भारतीय लष्कराच्या वतीने एअर कमांडर एस.बोराडे, कॅडमो विनोदकुमार, ले.कर्नल एसपीएस रावत, मेजर अंकित शर्मा यांनी तर प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनीदेखील पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले.
खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ.राहुल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपविभागीय अधिकारी महेश पाटील, तहसीलदार दिपक पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्या रत्नपारखी यांनीदेखील शहीद गोसावी यांना श्रद्धांजली अर्पण केली.