Published On : Wed, Jun 30th, 2021

प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या भरपूर संधी : ना. गडकरी

डॉ. गाडगीळ स्मृती व्याख्यान 5 टन धानाच्या तणसापासून 1 टन सीएनजी
मच्छ अर्थव्यवस्था 5 लाख कोटींची होऊ शकते

नागपूर: देशातील प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या आणि प्रगतीच्या भरपूर संधी आहेत. तसेच क्षमताही खूप आहेत. गरज आहे ती दूरदृष्टीची. उद्यमशीलता निर्माण झाली तर ते शक्य होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

डॉ. गाडगीळ स्मृती व्याख्यानाअंतर्गत ते आभासी कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला ना. सुभाष देसाई, रवी बोरटकर, सुधीर मेहता, डॉ. राजीव पोतदार, श्रीमती मीनल मोहाडीकर, दीपक नाईक, नंदकिशोर कासलीवाल, विठ्ठल कामत आदी उपस्थित होते. सहकाराची यशस्वी गाथा म्हणजे धनंजयराव गाडगीळ असल्याचे सांगून ना. गडकरी म्हणाले- कृषी क्षेत्रातील समस्यांची धनंजयरावांना जाण होती. या समस्या सहकाराच्या माध्यमातून सोडविण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला. कृषी विकासाला प्राधान्य देण्याची आज गरज आहे.

कारण अनेक समस्यांचा सामना हे कृषी क्षेत्र करीत असून या क्षेत्राची तुलना अन्य क्षेत्राशी करता येत नाही. उत्पादन क्षेत्रही अधिक महत्त्वाचे आहे. कारण या क्षेत्रामुळे अधिकाधिक रोजगार निर्मिती होऊ शकते. संपूर्ण जग आज भारताशी व्यवहार करू इच्छिते असे चित्र निर्माण झाले असताना आपल्याला या संधीचा उपयोग घेता आला पाहिजे. आणि त्यासाठी दूरदृष्टीची गरज असल्याचेही ते म्हणाले.

माहिती आणि जैव तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे योगदान आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीत असल्याचे सांगताना ना. गडकरी म्हणाले- देशात अभियंत्यांसारखे कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्ध असणे ही अर्थव्यवस्थेसाठी सुखद बाब आहे. मासेमारी उद्योगाचे उदाहरण देताना ते म्हणाले- मासेमारीतून निर्माण होणारी अर्थव्यवस्था 5 लाख कोटींची होऊ शकते. कारण 18 टक्के लोक समुद्रकिनार्‍यांलगत राहतात व मासेमारीचा व्यवसाय करतात. नवीन तंत्रज्ञान, संशोधनाचा उपयेाग करून या अर्थव्यवस्थेत अधिक वाढ संभवते. या क्षेत्रामुळे प्रोसेसिंग, पॅकेजिंगसारखे लघु उद्योग सुरु होऊ शकतात आणि निर्यातवाढ होऊ शकते. नवीन तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्यमशीलता असली तर निश्चितपणे रोजगार निर्मिती होऊन आयातीला पर्याय निर्माण होईल, असेही ते म्हणाले.

पेट्रोल डिझेलला पर्याय निर्माण होणार्‍या जैविक इंधनावर सध्या आपण काम करीत असल्याचे सांगताना ना.गडकरी म्हणाले- साखरेपासून इथेनॉल निर्मिती, देशात इथेनॉल आणि पेट्रोल दोन्हीवर चालणारे फ्लेक्स इंजिन आणणे, सीएजीवर ट्रॅक्टर चालविणे शक्य आहे. इलेक्ट्रिक वाहने, या मार्गाने प्रयत्न सुरु आहेत.

5 टन धानाच्या तणसापासून 1 टन सीएनजी निर्माण होऊ शकतो, हे सिध्द झाले आहे. यामुळे क्रूड ऑईल आयात कमी होऊन अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. पर्यायी जैविक इंधनाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटींपर्यंत जाऊ शकते, असे सांगून ते म्हणाले- आदिवासी क्षेत्राच्या विकासाशिवाय महाराष्ट्राचा विकास अपूर्ण आहे. सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागास असलेल्या भागाचा विकास करण्यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.