| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jul 8th, 2019

  अनारक्षित तिकीट मोबाईलवर मिळविण्यासाठी अपॅचा प्रचार

  -स्टेशनपासून ५ किमी ते २५ मीटर परिघात तिकीट काढणे शक्य
  – अ‍ॅप वापरण्याचे आवाहन

  नागपूर: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मोबाईलवर अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या यंत्रणेचा पाहिजे तसा उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे या अ‍ॅपच्या प्रचारार्थ रेल्वे कर्मचाºयांसह स्काऊट अ‍ॅन्ड गाईड्सचे रेंजर्स प्रवाशांपर्यंत पोहचून तिकीट काढण्यासाठी अ‍ॅपचा उपयोग करण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच अ‍ॅप विषयी सविस्तर माहिती सुध्दा देत आहेत.

  कॅशलेस व्यवहार, पर्यावरण पुरक पेपरलेस तिकीट या संकल्पनांना चालना देण्याच्या दृष्टीने रेल्वेने “यूटीएस अ‍ॅप’द्वारे अनारक्षित रेल्वे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे घरबसल्या केवळ एका क्लिकवर रेल्वे तिकीट काढणे शक्य झाले आहे. त्यामुळे लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याचा मनस्तापही कमी झाला आहे. परंतु, अजूनही अ‍ॅपचा पाहिजे तसा वापर होताना दिसत नाही. अ‍ॅपचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्या अंतर्गत महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर हेल्प डेस्क सुरू करण्यात आले आहे.

  येथून प्रवाशांना अ‍ॅप डाऊनलोड करण्यासह उपयोग करण्याच्या पद्धतीविषयी माहिती दिली जात आहे. याशिवाय बॅनर, भिंतीपत्रक, पत्रकं, उद्घोषणा प्रणालीवरूनही प्रवाशांना “यूटीएस मोबाईल अ‍ॅप’च्या वापराची माहिती दिली जात आहे. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वात रेल्वेस्थानकांवर शिबिरांचे आयोजन करून वाणिज्य निरीक्षकांकरवी अ‍ॅपसंदर्भात जागृतीचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय भारत स्काऊट अ‍ॅन्ड गाईडचे गाईड रेंजर्सच्या मदतीनेसुद्धा प्रवाशांपर्यंत अ‍ॅपसंदर्भातील माहिती पोहचविली जात आहे. अ‍ॅपद्वारे तिकीट काढणे फारच सोपे असून स्टेशनपासून ५ किमी ते २५ मीटर परिघात तिकीट काढणे शक्य आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145