मनपा सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव पारित
नागपूर: सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून नागपूर महानगरपालिकेच्या मंगळवारी (ता.२२) पार पडलेल्या महासभेतही त्याचे पडसाद उमटले. सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यकाळाला मुदतवाढ देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी समर्थन देत मंजुरी दिली.
सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर आणि नगरसेवक विजय झलके यांनी अनुमोदन दिले. निगम सचिवांनी या प्रस्तावाचे वाचन केले. इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून पुनर्स्थापित होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या होणाऱ्या निवडणुकांना महाराष्ट्र शासनाद्वारे तातडीने स्थगिती द्यावी, असा सभागृहातील सदस्यांचा मानस आहे.
अस्तित्वात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संपुष्टात येणाऱ्या कार्यकाळाला यथायोग्य मुदतवाढ देण्यात यावी, असे या प्रस्तावात म्हटले आहे. यावर ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी हा राज्य सरकार तसेच न्यायालयाचा विषय असून यावर आपण निर्णय घेउ शकत नाही, असे सांगितले. यावर हा प्रस्तावच राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवत असल्याचे नमूद असून केवळ नागपूर महानगरपालिकाच नव्हे तर राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाळ आरक्षण पुनर्स्थापित होईपर्यंत वाढविण्यात यावा, असे प्रस्तावात नमूद असल्याचे सभाध्यक्ष महापौर दयाशंकर तिवारी यांनी लक्षात आणून दिले. यानंतर सर्व सदस्यांनी प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि महासभेने प्रस्ताव मंजूर केला.