Published On : Tue, Jun 22nd, 2021

मतदारांनी फोटो जमा न केल्यास नावे यादीतून वगळणार

मतदार नोंदणी अधिकारी 57- नागपूर उत्तर विधानसभा

नागपूर : 57-नागपूर उत्तर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघांमध्ये 3 लाख 95 हजार 734 मतदारांपैकी 36 हजार 929 मतदारांचे फोटो मतदार यादीत नाहीत. मतदार यादीत मतदारांच्या नावासमोर फोटो असणे आवश्यक आहे.तरी मतदारांनी 30 जूनपर्यंत फोटो जमा करावे, असे मतदार नोंदणी अधिकारी 57- नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ यांनी कळविले आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन हे फोटो मिळविण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. यावेळी अनेक मतदार हे स्थलांतरीत असल्याचे दिसून आले आहे. त्याबाबत त्यांनी पंचनामे करून त्याची प्रत सार्वजनिक ठिकाणी लावली आहे. त्याबाबतच्या याद्या मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. तसेच स्थलांतरीत मतदारांच्या नावाची यादी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना पाठविण्यात आली आहे.

सर्व मतदार, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व मतदारांनी नागपूर डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळवर भेट द्यावी. तेथील मतदारयादीतून वगळणी करण्यात येणाऱ्या मतदारांच्या यादीत नाव नाही, याची खात्री करून घ्यावी. मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात किंवा केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडेही खातरजमा करता येईल.

या वगळणी यादीत संबंधित मतदाराचे नाव असल्यास त्यांनी आपले छायाचित्र केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे अथवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात जमा करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी डॉ. सुजाता गंधे 57- नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.