Published On : Sat, Jul 20th, 2019

नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या अमृत महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम गडकरींच्‍या उपस्थितीत संपन्न

Advertisement

विदर्भाच्या व्यापार व औद्योगिक विकासाची रुपरेषा नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ने आखावी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

नागपूर: विदर्भातील एम.एस,एम.ई. उद्योग, कृषी उद्योग यांच्या विकासासाठी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने पुढाकार घेऊन भविष्यातील एक रुपरेषा आखावी. याकरिता केंद्र व राज्य सरकार आवश्यक ते सर्व सहकार्य करेल. विदर्भाच्या व्यापार व उद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स (एन.व्ही.सी.सी.) एक उत्प्रेरक ठरेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूर ये‍थे केले. स्‍थानिक हॉटेल तुली इंपेरियल येथे नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, महापौर श्रीमती नंदा जिचकार, नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हेमंत गांधी, एन.व्ही.सी.सी अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश मेहाडिया प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर झिरो माईलचे ठिकाण असल्याने आंतरराष्‍ट्रीय एयर कनेक्टिव्हीटि शहराला मिळत आहे . महिना भरात आंतरराष्‍ट्रीय विमानतळाचे बांधकाम सुरु होणार असून नागपूर देशातील महत्वाच्या शहारासोबतच आफ्रिका युरोपच्या शहरासोबत जोडले जाईल. याच मध्यवर्ती स्थानामुळे नागपूरात लॉजिस्टीकच्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

‘बाजारपेठांचे स्थलांतरण’ या चेंबरने उपस्थित केलेल्या विषयासंदर्भात गडकरी यांनी सांगितले की, नागपूर मधील कॉटन, संत्रा, सक्करदरा , बुधवारी मार्केट यांचा आराखडा चेंबरच्या सदस्यांनी पहावा व त्यामधील सुधारणा सुचवाव्यात. या व्यापारी जागेत एन.व्ही.सी.सी. ला जागा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. एन.व्ही.सी.सी. ने प्लास्टीक, रेडिमेड गार्मेंट, टेक्सटाईल उद्योगातील जाणकार व अनुभवी उद्योजकांचे ‘एक्स्पर्ट सेल्स’ बनवावेत, असेही त्यांनी यावेळी सुचविले.

याप्रसंगी गडकरींच्या हस्ते नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित ‘अमृतपुष्प’ या स्मरणिकेचेही विमोचन करण्यात आले. लोकमतचे वाणिज्य संपादक सोपान पांढरीपांडे व दै. भास्करचे समन्वय संपादक आनंद निर्बाण यांना वाणिज्य पत्रकारितेतील उल्लेखनिय योगदानाबद्दल मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या कार्यकमास नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी व शहरातील व्यापारी , उद्योजक बहुसंख्येने उपस्थित होते.