Published On : Fri, Jul 13th, 2018

कुपोषण संपविण्यासाठी पोषण अभियान प्रभावीपणे राबवा – पंकजा मुंडे

नागपूर: कुपोषणाचा समूळ नायनाट करण्यासाठी व भावी पिढी सशक्त बनविण्याकरिता राज्यात पोषण अभियान कार्यक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले.

महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई तर्फे सिव्हील लाईन्स परिसरातील हिस्लॉप कॉलेज जवळील चिटणवीस सेंटर येथे आयोजित राज्यस्तरीय पोषण अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

मंचावर महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाचे सहसचिव डॉ. राजेश कुमार, राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या सचिव विनीता वेद सिंगल, ग्राम विकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, एकात्मिक बाल विकास सेवा योजनाचे आयुक्त इंद्रा मालो, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, राजमाता जिजाऊ मिशनचे संचालक श्री. नागरगोजे आदींची उपस्थिती होते.

पोषण अभियान हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असल्याचे सांगून श्रीमती मुंडे म्हणाल्या की, देशातील बालमृत्यू व कुपोषण थांबविण्यासाठी शासनाने हे महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. देशाची पिढी सशक्त बनविण्यासाठी यामध्ये सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. सन 2022 पर्यंत जगात सर्वाधिक तरूणांची संख्या भारतात असणार आहे. त्यामुळे या पिढीला सशक्त बनविण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. त्याकरीता माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी पोषण अभियान राज्यात यशस्वीपणे राबविण्यात यावे. शंभर टक्के हे अभियान राबविणारे महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरावे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

माता सशक्त असेल तरच सशक्त बालकाचा जन्म होऊ शकतो, यासाठी मातेला पोषक आहार व चांगली आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे, या अभियानाच्या माध्यमातून डिजीटल पध्दतीने नोंदवली जाणारी आकडेवारी समोर आल्यानंतर त्या अनुषंगाने उपाययोजना करणे सुलभ होईल, त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी आकडेवारीची नोंद अचूकपणे करावी. जेणेकरुन पोषण अभियानाच्या माध्यमातून माता व बालकाचे पोषण योग्यरित्या होण्याबरोबरच कुपोषण दूर होण्यास हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

विद्या ठाकूर म्हणाल्या, या पोषण अभियानाचे उद्दिष्ट कुपोषण कमी करणे हे आहे. पल्स पोलिओ मिशनसारखे हे अभियान राबविण्याची आवश्यकता आहे. पोषणासंबंधी विविध योजनांचे एकत्रीकरण करून कुपोषण आणि त्यासंबंधीच्या समस्या कमी करणे, हे पोषण अभियानाचे प्रमुख लक्ष्य आहे. हे अभियान राज्यात यशस्वी करण्यासाठी अधिकारी, अंगणवाडी सेविका यांची प्रमुख जबाबदारी आहे. या अभियानाच्या माध्यमातून शून्य कुपोषण करणे हे उद्दिष्ट आहे. या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देऊन सर्वांनी समन्वयाने हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी राजेश कुमार, विनीता वेद सिंघल, आसीम गुप्ता यांनीही मार्गदर्शन केल. प्रास्ताविक इंद्रा मालो यांनी केले.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्राचे वितरण

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या 10 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या मुदत ठेव योजनेचे प्रमाणपत्र याप्रसंगी देण्यात आले. यामध्ये खुशी धनराज लोणारे, अनन्या रामू श्रीरामे, श्रेया राजेश सार्वे, अवनी आनंद पंचीपात्रे, गीतिका चंद्रशेखर जगनाडे, वैदही दिपक बडवाईक, दृष्टी अंकुश बागडे, अवनी भगवान दहिवले, खुशबू रामलाल भलावी, सावली संजय पंधरे, जितीका अतुल नगरारे, वैदही महादेव भोवरे यांचा समावेश होता.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पर्यवेक्षिकांचा गौरव

उत्कृष्ट कामगिरी करणा-या पर्यवेक्षिकांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील उषा गुलाबराव घोरमारे, वर्धा जिल्ह्यातील ललीता आसटकर, धुळे जिल्ह्यातील वैशाली अरविंद निकम, भंडारा जिल्ह्यातील शारदा बालाजी वाकोडीकर, अमरावती जिल्ह्यातील सालोहा शिरीन खान, चंद्रपूर जिल्ह्यातील कल्पना किसनराव नगराळे, बुलढाणा जिल्ह्यातील अश्विनी अशोक सोने व स्मिता राहुल भोलाने, अकोला जिल्ह्यातील उज्वला विजय शेट्ये, वाशिम जिल्ह्यातील मिनाक्षी माधवराव सुळे, नागपूर जिल्ह्यातील पुष्पाताई उमाळे, गोंदिया जिल्ह्यातील रचना गहेरवाल यांचा सामवेश होता.

यावेळी सर्व जिल्हयातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास अधिकारी, पर्यवेक्षिका आदींची उपस्थिती होती.