Published On : Fri, Jul 13th, 2018

नव्या माध्यमांची तत्त्वे समाज व माध्यमांनी ठरवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर: नवीन समाज माध्यमांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करताना समाज विघातक विचार समाजात पोहोचणार नाहीत, याची दक्षता समाज व माध्यमांनी घेण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

प्रेस क्लबच्या सभागृहात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, नागपूर प्रेस क्लब आणि प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त वतीने ‘फेक न्यूज: परिणाम आणि दक्षता’ या विषयावर पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी, प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी, पत्रकार राहुल पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, भारतीय संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. परंतु या अधिकाराचा वापर करताना समाज विघातक विचार लोकांपर्यंत पोहोचणार नाही याची दक्षता प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे. समाज हा संक्रमणावस्थेत असताना शाश्वत तत्त्वे सांभाळताना युगानुकुल तत्वे निर्माण करावी लागतात. या तत्वांचा सदृढ समाज निर्मितीसाठी उपयोग केल्यास समाजाचे प्रबोधन करण्यास मदत होईल. अफवांच्या बातम्यांमुळे समाजाचे स्वास्थ्य बिघडते. प्रसंगी दोन समाज परस्परांच्या विरोधात समोरासमोर येतात. यामधून दंगली देखील घडल्या आहेत. सत्यदेखील समाजमाध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. अफवांना आळा घालण्यासाठी आज समाज प्रबोधनाची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

गेल्या दोन दशकांमध्ये जस-जसा इंटरनेटचा वापर वाढला आहे तस-तसे लोकांना अभिव्यक्त होण्यासाठी माध्यमे देखील मिळाल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या मनातील आशा, आकांक्षा अभिव्यक्त होऊ लागल्या आहेत. पूर्वी माध्यमे नसल्यामुळे थेट अभिव्यक्त व्हावे लागत होते. त्यामुळे संवाद हा समोरासमोर व्हायचा. समोरासमोरच्या संवादामुळे पुष्कळदा लोकांची मानसिकता संवाद करायची नसायची. मात्र विविध संवाद समाज माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे लोक व्यक्त होऊ लागले आहेत. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग प्रत्येक जण घेऊ लागला आहे. मनातील गोष्ट दडवून न ठेवता कोणत्यातरी समाज माध्यमातून व्यक्त करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य हे असिमीत असले पाहिजे. त्याला कुठलीही सीमा नसावी, असे सांगून श्री फडणवीस म्हणाले, पण त्याचवेळी त्या व्यक्तीने हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की, जसे मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तसे दुसऱ्याला देखील आहे. मात्र या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी झाला पाहिजे. अभिव्यक्तीसाठी तत्त्वांची व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. समाजाने देखील आपली जबाबदारी अशा वेळी योग्य प्रकारे पार पाडली पाहिजे. तंत्रज्ञानाने निर्बध टाकता येत नसेल तर समाजाने तशी व्यवस्था निर्माण करून काम करावे. ज्यामुळे आपल्याला खरे काय आणि खोटे काय हे देखील ओळखता येईल. आलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही याचा विचार देखील करावा लागेल. ज्या संक्रमण अवस्थेतून आपण चाललो आहोत, त्या माध्यमांनाही नवीन युगाचे तत्त्वे ठरवावी लागणार आहेत. समाज व लोक प्रबोधनातून तत्त्वे तयार झाली तर अफवांना नक्कीच आळा बसेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

ब्रिजेश सिंह म्हणाले की, प्रत्येकाने जागरूकपणे आणि जबाबदारीने समाजमाध्यमांचा वापर करावा. प्रसार माध्यम प्रतिनिधींनी अफवांना आळा घालण्यासाठी आपल्या लेखनीतून प्रबोधन करावे. आपल्याला असलेल्या व्यक्तिमत्व स्वातंत्र्याचा दुरुपयोग होणार नाही याची दक्षता देखील प्रत्येकाने घेतली पाहिजे. आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून अफवांना आळा घालण्याबाबत विविध तज्ञांनी उपयुक्त मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले.

समारोपीय कार्यक्रमाला माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक शिवाजी मानकर, नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख प्रा. डा. मोईझ हक यांच्यासह अन्य प्रसार माध्यम प्रतिनिधी, अनेक क्षेत्रातील मान्यवर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी-कर्मचारी, नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विवेक नानोटी यांनी केले तर संचालन प्रा. डॉ. भूमिका अग्रवाल यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी मानले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement