Published On : Mon, Jun 8th, 2020

आता भौतिक दूरत्व राखण्यासाठी उद्घोषणा

-रेल्वे स्थानकाचे बदलते स्वरूप
– कोरोनानंतरचे रेल्वेतील जीवन

नागपूर: विना तिकीट प्रवास करू नका…रेल्वे नियमांचे पालन करा… अशाप्रकारची उद्घोषणा रेल्वे स्थानकावरून पूर्वी व्हायची. आताही होते. मात्र, आता रेल्वे स्थानकाचे चित्र बदलत चालले असून उद्घोषणेतही बदल झाला आहे. भौतिक दूरत्व राखा…चेहèयावर मास्क वापरा… निर्जंतुकीकरण करा आणि स्वच्छता राखा, अशा उद्घोषणेला प्राधान्य दिले जात आहे. कोरोना काळात आणि नंतरचे जीवन तसेच रेल्वे स्थानकावरील संपूर्ण चित्र बदलले आहे.

रेल्वे म्हणजे अद्भूत विश्व. रेल्वे गाड्यांची धडधड…प्रवाशांची वर्दळ…कुलींची धावपळ, विक्रेत्यांची ओरड आणि गोड आवाजातील उद्घोषणाप्रणालीमुळे या विश्वात व्यक्ती रमुन जाते. गर्दीत सारेकाही विसरून जाते. ते दिवस संपले आहेत. ती गर्दीही नाही आणि विक्रेत्यांची ओरडही नाही. नियोजित वेळेत गाडी येत असल्याच्या सूचनेसह रेल्वे नियम पाळण्याची उद्घोषणा मात्र होते.

रेल्वे स्थानक, गाडी आणि फलाटावर या सूचनांचे पालन व्हावे असा प्रयत्न सुरक्षा विभागाकडूनही होत आहे. कारोनामुळे लोकांत धडकी भरली आहे. प्रवासी तसेही सतर्क आहेतच. मात्र, रेल्वे प्रशासन वेळोवेळी उद्घोषणा करून प्रवाशांत जनजागृती करीत आहे. येवढेच काय तर भौतिक दूरत्व राखण्यासाठी रेल्वे स्थानकावर, प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या लोखंडी आणि सिमेंटच्या बाकडावर मार्किंग करण्यात आले आहे.

स्थानकात प्रवेश करताना, बाहेर पडताना तसेच गाडीत बसताना आणि उतरताना योग्य काळजी घेतातच. अधिकारी, कर्मचारी, लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफ जवान यांच्यासह कंत्राटी कामगारही या नियमांचे पालन करताना दिसत आहेत. श्रमिक विशेष आणि राजधानी स्पेशलनंतर सोमवारपासून २०० नॉन एसी गाड्याही सुरू करण्यात आल्या. रेल्वेत प्रवास करण्याची कार्यप्रणाली आधीसारखी राहिली नाही. प्रवाशांना गाडी येण्याच्या ९० मिनिटांपूर्वी स्थानकावर पोहोचावे लागणार. तिकीट तपासणी तसेच स्क्रिqनग केल्याशिवाय कुणालाही फलाटावर प्रवेश देण्यात येणार नाही. मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या मार्गदर्शनात आणि वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांच्या नेतृत्वात नियोजन सुरू आहे.

सध्या फलाट २ आणि ३ चा उपयोग
सध्या रेल्वे स्थानकावर केवळ फलाट क्रमांक २ आणि ३ चा उपयोग करण्यात येतो आहे. प्रवाशांच्या प्रवेश आणि बाहेर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार करण्याचे निर्देश आहेत. अशात नागपुरातून बसणाèया प्रवाशांना इटारसीकडील उड्डाणपुलावरून फलाट क्रमांक २ आणि ३ वर पोहोचता येईल. गाडीतून उतरणाèया प्रवाशांना मुंबईकडील उड्डाणपुलावरून आरपीएफ ठाण्याजवळील दारातून बाहेर पडता येईल. याशिवाय फलाट क्रमांक १ ते ८ पर्यंत भौतिक दूरत्व राखण्यासाठी मार्किंग करण्यात आले आहे.