Published On : Mon, Jun 8th, 2020

कमीत कमी खर्चात मनपाचे नाले सफाई अभियान

Advertisement

मागील वर्षीच्या तुलनेत अर्ध्यापेक्षा कमी खर्चात अभियान पूर्णत्वाकडे : २२७ पैकी २११ नाले सफाई पूर्ण

नागपूर: कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाउनचा फायदा घेत नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील नदी व नाले सफाई मोहिम हाती घेण्यात आली. विशेष म्हणजे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात या वर्षी अत्यंत कमीत कमी खर्चात शहरातील नाले सफाई करण्यात येत आहे. विहीत कालावधीच्या आतच शहरातील सर्व नाल्यांची सफाई होत आहे. शहरातील एकूण २२७ नाल्यांपैकी आतापर्यंत २११ नाल्यांची सफाई पूर्ण झाली असून उर्वरित १६ नाल्यांपैकी १५ नाल्यांची सफाई सुरू असून प्रलंबित एका नाल्याचीही सफाई लवकरच पूर्ण होणार आहे. उल्लेखनिय म्हणजे, यंदा केवळ ४३ लाख ७९ हजार २८० रुपये एवढा निधी नाले सफाई करिता प्रस्तावित करण्यात आला आहे. मागील वर्षीच्या खर्चाच्या तुलनेत हा निधी केवळ 43 टक्के आहे. मागील वर्षी नाले सफाईकरिता १ कोटी ३३ लाख ३० हजार ३६० रुपये निधी प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी १ कोटी २ लाख ९५ हजार ६१८ रुपये एवढा निधी खर्च करण्यात आला होता.

लॉकडाउनच्या काळात शहरातील नाल्यांची सफाई करण्याबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश निर्गमित केले होते. एप्रिल महिन्यापासून शहरातील सर्व झोनमध्ये नाले सफाईचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नाल्यांची सफाई मार्च महिन्यापासून केली जात आहे. शहरातील मुख्य नाल्यांमध्ये हत्तीनाला गड्डीगोदाम, बाळाभाउपेठ, बोरीयापूर, डोबीनगर, लाकडीपूल, तकीया, नरेंद्रनगर, बुरड नाला आदी मोठे आणि इतर छोटे असे एकूण २२७ नाले आहेत. मशीनद्वारे नाले सफाई करिता मनपाच्या सहा आणि भाडेतत्वावर आठ अशा एकूण १४ मशीनद्वारे सफाईचे काम सुरू आहे. याशिवाय मनुष्यबळाद्वारे लहान नाल्यांची सफाई केली जात आहे.

नागपूर शहरातील दहाही झोन अंतर्गत २२७ नाले आहेत. यापैकी धंतोली व सतरंजीपुरा झोनचे कार्य शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तर केवळ एकाच नाल्याची सफाई बाकी असून इतर सर्व नाल्यांच्या सफाईचे काम प्रगतीपथावर आहे.

सोमवारी (ता.८) प्राप्त झालेल्या अहवालानुसार आतापर्यंत एकूण २११ नाल्यांची सफाई पूर्ण झाली आहे. त्यानुसार लक्ष्मीनगर झोन अंतर्गत एकूण २२ नाले असून यापैकी २० नाल्यांची सफाई पूर्ण झालेली आहे. सफाई पूर्ण झालेल्या २० नाल्यांमधील १४ नाल्यांची मनुष्यबळाद्वारे तर ६ नाल्यांची मशीनद्वारे सफाई करण्यात आली. उर्वरित दोन्ही नाल्यांची मनुष्यबळाद्वारे सफाई केली जात आहे. धरमपेठ झोन अंतर्गत एकूण ३५ नाले असून यापैकी ३० नाल्यांची (२५-मनुष्यबळाद्वारे, ५ मशीनद्वारे) सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित चार नाल्यांपैकी दोन मनुष्यबळाद्वारे व दोन मशीनद्वारे सफाई सुरू आहे तर एका नालयाचे मशीनद्वारे सफाई करणे बाकी आहे.

हनुमाननगर झोन अंतर्गत एकूण १४ नाल्यांची सफाई करणे अपेक्षित आहे. त्यापैकी १३ नाल्यांची (७-मनुष्यबळाद्वारे, ६ मशीनद्वारे) सफाई पूर्ण झाली असून उर्वरित एका नाल्याची मशीनद्वारे सफाई सुरू आहे. धंतोली झोन अंतर्गत येणा-या संपूर्ण १४ नाल्यांची सफाई (९-मनुष्यबळाद्वारे, ५ मशीनद्वारे) पूर्ण झाली आहे. नेहरूनगर झोन अंतर्गत एकूण १५ नाले असून त्यापैकी १४ नाल्यांची सफाई (११-मनुष्यबळाद्वारे, ३ मशीनद्वारे) सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित एका नाल्याची मशीनद्वारे सफाई सुरू आहे.

सर्वाधिक नाले गांधीबाग झोनमध्ये
गांधीबाग झोन अंतर्गत सर्वाधिक ५१ नाले आहेत. यापैकी ५० नाल्यांची सफाई (४६-मनुष्यबळाद्वारे, ४ मशीनद्वारे) पूर्ण झाली असून एका नाल्याची मशीनद्वारे सफाई सुरू आहे. सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणा-या संपूर्ण २२ नाल्यांची सफाई (१८-मनुष्यबळाद्वारे, ४ मशीनद्वारे) पूर्ण झाली आहे. लकडगंज झोन अंतर्गत एकूण सात नाले आहेत. यापैकी सहा नाल्यांची सफाई (५-मनुष्यबळाद्वारे, १ मशीनद्वारे) पूर्ण झाली असून उर्वरित एका नाल्याची मशीनद्वारे सफाई सुरू आहे. आसीनगर झोन अंतर्गत एकूण १८ नाले असून यापैकी १७ नाल्यांची सफाई (७-मनुष्यबळाद्वारे, १० मशीनद्वारे) पूर्ण झाली आहे. उर्वरित एका नाल्याच्या सफाईचे कार्य मशीनमार्फत सुरू आहे. मंगळवारी झोन अंतर्गत एकूण २९ नाले आहेत. यापैकी २५ नाल्यांची (१०-मनुष्यबळाद्वारे, १५ मशीनद्वारे) सफाई पूर्ण झाली आहे. उर्वरित चार नाल्यांची मशीनद्वारे सफाई सुरू आहे.