Published On : Sat, Jun 30th, 2018

मराठ्यांनी मोठे केलेल्या नेत्यांना आता इंगा दाखवू – मराठा समाज

Advertisement

उस्मानाबाद : आतापर्यंत शांततेच्या मार्गाने ५८ मोर्चे काढण्यात आले. मात्र, सरकार झोपेचे सोंग घेऊन आहे़. मराठा समाज शांत असला तरी आता मराठ्यांच्या मागण्यांसाठी आरपारची लढाई लढण्यात येईल. तुळजाभवानी मातेच्या दरबारात झालेल्या जागरण-गोंधळानंतर आता उद्यापासून राज्यभर होणारा गोंधळ बघावयास मिळणार आहे. आता जे काही घडेल किंवा बिघडेल त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवरच राहील. असा कडक इशारा मराठा समाजाने शुक्रवारी तुळजाभवानीच्या साक्षीने सरकारला दिला़.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसदर्भात आंदोलनाचे दुसरे पर्व शुक्रवारी सुरू करण्यात आले. सकाळी ११़३० वाजता मोर्चेकऱ्यांनी येथील शिवरायांच्या अन् शंभुराजेंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला सुरुवात केली़. तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या महाद्वारावर पोहोचल्यानंतर जागरण-गोंधळ घालण्यात आला़

Advertisement

यावेळी आबासाहेब पाटील, नानासाहेब जावळे, रमेश केरे-पाटील, सुनील नागणे, जीवनराजे इंगळे या पाच प्रमुख वक्त्यांनी मोर्चाला संबोधित करताना आंदोलनाची पुढील दिशा व भूमिका स्पष्ट केली़. मराठ्यांना आरक्षण, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना संरक्षण आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातही बदल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली़. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यभरात ५८ मूक मोर्चे काढण्यात आले. मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चानंतर एक महिन्यात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते़. यावेळी काही घोषणाही सरकारतर्फे करण्यात आल्या होत्या. मात्र, या घोषणांवरही अंमलबजावणी केली नाही़. मुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून समाजाचा विश्वासघात केला आहे़. आता हे सरकार मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही, हे स्पष्ट झाले असून, ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे़ त्यामुळे शिवरायांनी स्वराज्यासाठी जी गनिमी काव्याची नीती वापरली होती, त्याच नीतीने पुढची आंदोलने होतील़. असा इशारा देण्यात आला.

आता यापुढे शांततेच्या मार्गाने न जाता आपल्या हक्कासाठी जे काही करावं लागेल ते करणारच. त्यात जे काही घडेल-बिघडेल त्यास पूर्णपणे सरकारच जबाबदार राहील़. आरक्षण हा आमचा हक्क आहे़. तो मिळविल्याशिवाय शांत राहणार नाही़. मराठ्यांच्या भरवश्यावर मोठे झालेल्या नेत्यांनाही आता इंगा दाखवू, अशा तीव्र शब्दांत वक्त्यांनी सरकारला अन् नेत्यांना इशारा दिला़.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement