Published On : Tue, Aug 6th, 2019

आता मनपा आवारात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’

‘रिचार्ज शाफ्ट’चे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन : छतावरील पाण्याने वाढविणार भूजल पातळी

नागपूर : भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने सर्व मोठ्या इमारतींमध्ये ‘रेन वाटर हार्वेस्टिंग सिस्टीम’ लावण्याचे आवाहन केले आहे. या श्रृंखलेमध्ये छत पाऊस पाणी संकलन रिचार्ज शाफ्टद्वारे पुनर्भरण योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत परिसरात भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या तांत्रिक मार्गदर्शनात ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ करण्यात येत आहे. याच अंतर्गत ‘रिचार्ज शिफ्ट’ कामाचे भूमिपूजन मंगळवारी (ता. ६) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते मनपा मुख्यालय परिसरात करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती अभय गोटेकर, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती संजय बालपांडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सत्तापक्ष प्रतोद दिव्या धुरडे, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची सभापती अभिरुची राजगिरे, आरोग्य समितीचे उपसभापती नागेश सहारे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, नगरसेविका प्रगती पाटील, शिल्पा धोटे, रुतिका मसराम, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, मनोज गणवीर, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे उपसंचालक डॉ. शिवाजी पद्‌मने, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने, सहायक भूवैज्ञानिक आय.पी. घोडेस्वार, कनिष्ठ भूवैज्ञानिक श्रीमती टी. गोटे, अजय सावंत उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी भूमिपूजन करून रेन वॉटर हार्वेस्टिंग अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या ‘रिचार्ज शाफ्ट‘ कामाचा प्रारंभ केला. यावेळी महापौरांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली. मनपा मुख्यालय इमारतीच्या छतावर जमा होणारे पावसाचे पाणी गाळणी खड्ड्याद्वारे गाळून उभ्या विंधन विहिरीमध्ये जमिनीत सोडून पुनर्भरण करण्याची प्रणाली म्हणजेच ‘रिचार्ज शाफ्ट’ असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने यांनी सांगितले. या प्रणालीद्वारे वाहून जाणारे भूपृष्ठीय पाणी स्वच्छ करून जमिनीच्या आत सोडले जाते. त्यामुळे भूजल पातळीमध्ये वाढ होऊन भूजलाचे संरक्षण होते. अशा प्रकारे योग्य भूस्तर असलेल्या नदी, नाल्यांत किंवा छतावरील वाहून जाणाऱ्या पाण्यास पुनर्भरण करून भूजल स्तर वाढवू शकतो आणि टंचाईसदृषश परिस्थितीवर मात करू शकतो, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, संपूर्ण शहरातील मोठ्या इमारतींवर अशा प्रकारच्या प्रणालीने भूजल स्तर वाढविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. नागपूर महानगरपालिका यासाठी पुढाकार घेत असून येथूनच सुरुवात झाली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीवर एकूण १५७५४ घनमीटर पाणी उपलब्ध होणे अपेक्षित असून दोन रिचार्ज शाफ्टद्वारे प्रति शाफ्ट ७८७७ घनमीटर पाणी पुनर्भरण करण्यात येईल. नागपूर शहरातील सर्व शासकीय इमारती, मोठ्या सोसायट्या आदींमध्ये या प्रणालीचा अवलंब करण्यात यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला मनपाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.