नागपूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना गती देताना राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत सर्व महापालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी एक अधिसूचना प्रसिद्ध करत नागपूरसह १० महानगरपालिकांतील प्रभाग रचना आणि जागांची संख्या निश्चित केली आहे.
१५६ जागांसह नागपूर महापालिका निवडणूक-
राज्य सरकारच्या नव्या गॅझेटनुसार, २४ लाखांपासून ३० लाखांपर्यंत जनसंख्या असलेल्या महानगरपालिकांमध्ये कमाल १५६ प्रभाग सदस्य निवडले जातील. २०११ च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २५ लाखांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या निकषानुसार नागपूर महापालिकेतील सदस्यसंख्या आता १५६ इतकी ठरणार आहे.
पाच नवीन जागांची वाढ-
२०१७ साली नागपूर महापालिकेची निवडणूक झाली होती. त्या वेळी ३८ प्रभागांमध्ये एकूण १५१ जागा होत्या. त्यापैकी ३७ प्रभागांमध्ये प्रत्येकी ४ वार्ड होते, तर ३८ व्या प्रभागात ३ वार्ड होते. दर निवडणुकीत प्रभागरचना (डिलिमिटेशन) केली जाते. जरी २०११ नंतर नव्याने जनगणना झाली नसली तरी नागपूर शहराचा वेगाने होणारा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने महापालिकेत ५ नवीन जागा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या निवडणुकीत १५६ जागांसाठी मतदान होणार असून, त्यानुसार लवकरच प्रभागरचना जाहीर होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे आगामी निवडणूक अधिक चुरशीची होणार असून, विविध राजकीय पक्षांची तयारीही वेग घेण्याची शक्यता आहे.