नागपूर: नारा भागात बुधवारी पहाटे एका कुख्यात गुंडाचा त्याच्याच मित्राने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृताचे नाव बाबू चत्री असे असून, आरोपी मित्राचे नाव शाहू असे समजते. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, जरीपटका पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके नियुक्त केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर दोघांमध्ये काही कारणावरून तीव्र वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात शाहूने बाबू चत्रीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात बाबूचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली.
सध्या पोलिसांनी आरोपी शाहूच्या शोधासाठी विविध पथके तैनात केली असून, खूनामागील नेमका हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे.