नवी दिल्ली: शिवसेनेच्या नाव आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेल्या वादावर आज अंतिम सुनावणी अपेक्षित होती, मात्र ती पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याची पुढील तारीख १२ नोव्हेंबर अशी निश्चित केली आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी होणार होती. पण सशस्त्र दलासंबंधीच्या महत्त्वाच्या खटल्यामुळे न्यायालयास पुरेसा वेळ मिळू शकला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलावी लागली.
उद्धव ठाकरे गटाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्याने शक्य तितक्या लवकरची तारीख देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली. तर एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांकडून डिसेंबरमधील तारीख देण्याचा आग्रह ठेवण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने अखेरीस २ नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने कपिल सिब्बल यांना विचारले की, अंतिम युक्तिवादासाठी त्यांना किती वेळ लागेल? त्यावर सिब्बल यांनी उत्तर दिले की, “मला फक्त ४५ मिनिटे पुरेशी आहेत.
सिब्बल यांनी पुढे न्यायालयासमोर मांडणी करताना सांगितले की,जानेवारीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपेक्षित आहेत. त्या अगोदरच या खटल्यावर निकाल लागणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली.
तर शिंदे गटाकडून मात्र सुनावणी आणखी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या आधीही १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर दरम्यान राष्ट्रपती आणि राज्यपाल प्रकरणामुळे हा खटला थांबवण्यात आला होता.
आता सर्वांचं लक्ष १२ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे लागलं आहे.या दिवशी ‘खरी शिवसेना कोणाची? या प्रश्नावर कोर्टात निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे.