नागपूर: धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री गल्लीतील वादातून झालेल्या गोंधळानंतर दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जग्गू ननकू यादव (वय 50, रा. प्लॉट क्र. 85, एनआयटी लेआउट, जुनी अजनी, वर्धा रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे 10.15 वाजताच्या सुमारास यादव कुटुंब रात्रीचे जेवण करत असताना घराबाहेरून मोठ्या आवाजात शिवीगाळ ऐकू आली. यानंतर फिर्यादी, त्यांची सून आणि अन्य कुटुंबीय बाहेर आले असता, अर्जुन ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव (वय 25, रा. अजनी चौक) हा व्यक्ती गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत असल्याचे दिसून आले. त्याच्यासोबत कनिष्क डोंगरे हाही उपस्थित होता.
फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, या दोघांनी कुटुंबातील सदस्यांना अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या शिव्या दिल्या तसेच “आज एक एकाला पाहून घेतो” अशा प्रकारे धमकीही दिली. घटनेनंतर यादव यांनी तत्काळ धंतोली पोलिसांत धाव घेऊन तक्रार नोंदवली.
या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 अंतर्गत कलम 296, 351(2), आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनश्री शामकांत रायकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
धंतोली पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ही शिवीगाळ आणि धमकीचा प्रकार वैयक्तिक वादातून झाल्याचे दिसून आले असून पुढील तपास सुरू आहे.