Published On : Mon, Apr 9th, 2018

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन : ऊर्जामंत्री बावनकुळे


नागपूर: अपारंपरिक ऊर्जा निर्मिती हे देशाचे मिशन असून आगामी 5 वर्षात 10 हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे लक्ष्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेले हे स्वप्न आहे. ते स्वप्न आम्ही साकार करीत आहोत, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा येथे अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या 790 किलोवॅट प्रकल्पाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला प्रामुख्याने राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेष जोगळेकर, आर्किटेक्ट अशोक मोखा, डॉ. आनंद पाठक, आनंद औरंगाबादकर, कर्नल शर्मा उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले- रुफटॉप सोलरमध्ये 790 किलोवॅटचा प्रकल्प नियोजित वेळेत उभे करणारे हे हॉस्पिटल पहिले आहे. हे हॉस्पिटल मुख्यमंत्र्यांचे मिशन आहे आणि त्या माध्यमातून सौर ऊर्जेला गतिमान करण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच ग्रीन एनर्जी तयार करण्याला प्रोत्साहन देण्याची पंतप्रधानांची योजना आहे. त्या योजनेत हे हॉस्पिटलही सहभागी झाले आहे. नेट मीटरिंग या रुफटॉप सोलर योजनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे उद्योग व वाणिज्य ग्राहकांसाठी पारंपरिक ऊर्जा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल. अत्यंत स्वस्त दरात नैसर्गिक ऊर्जा लोकांना मिळत असून पर्यावरण रक्षणालाही हातभार लावला जात आहे.

या प्रकल्पातून 3500 युनिट वीज दररोज निर्मिती होणार आहे. 3 कोटी 37 लाख 57 हजार रुपयांच्या या प्रकल्पाला केंद्र शासनाने 91 लाख 50 हजार रुपये अनुदान दिले आहे. सौर ऊर्जेसोबत या हॉस्पिटलची इमारतही ग्रीन बिल्डिंग व्हावी असे आपल्याला वाटत असून त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही इमारत ग्रीन बिल्डिंग म्हणून गणली जावी, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना आपण देणार आहोत, असे सांगताना ऊर्जामंत्री म्हणाले- या हॉस्पिटलशेजारीच एक 33 केव्ही अत्याधुनिक उपकेंद्र उभारले जाणार आहे. देशातील पहिले अत्याधुनिक उपकेंद्र हे असेल. त्यासाठी 7 कोटी रुपये खर्च करणार आहोत. यामुळे येथील वीज कधीही खंडित होणार नाही, असेही ऊर्जा मंत्री म्हणाले.


सौर ऊर्जा ही काळाची गरज : डॉ. पाटील
सौर ऊर्जा ही काळाची गरज असून आता घरोघरी सौर ऊर्जा निर्मिती सुरु झाली तर नवल वाटणार नाही अशी स्थिती येत असल्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील म्हणाले. अत्यंत आधुनिक सोयींनी सुसज्ज अशा या हॉस्पिटलमध्ये होणारे उपचार उच्चदर्जाचे राहणार आहेत. सौर ऊर्जा निर्मितीमुळे पारंपरिक विजबिलासाठ़ी येणार्‍या खर्चात बचत होईल व तो खर्च रुग्णांसाठी वापरला जाईल. आगामी काळात प्रत्येक घराच्या छपरावर सौर वीज निर्मितीचे पॅनेल दिसतील असे काम या क्षेत्रात आता सुरु झाले आहे. नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संस्थेच्या प्रमुखांचे अभिनंदन केले. आर्किटेक अशोक मोखा यांचेही यावेळी भाषण झाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेष जोगळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शर्मा यांनी मानले. सुरुवातीला ऊर्जामंत्री बावनकुळे व गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते ऊर्जानिर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.