Published On : Mon, Apr 9th, 2018

नितीन गडकरींच्या ‘महत्वाकांक्षेला’ मनपाने फासला ‘हरताळ’?, नागनदी शुद्धीकरण प्रकल्प थंडबस्त्यात


नागपूर: “नागनदीचे शुद्धीकरण करून तेथे व्हेनिसच्या धर्तीवर नौकानयन सुरु करू”, अशी महत्वाकांक्षा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरींनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती. परंतु ते केवळ दिवास्वप्नच ठरेल की काय, अशी परिस्थिती आहे. कारण नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाचा ‘डीपीआर’ (अॅक्शन प्लॅन) ‘नीरीने’ तयार केला असून यासंबंधी सर्व पातळीवर चर्चा देखील पूर्ण झाली आहे. परंतु नागपूर महापालिकेने सदर योजनेच्या अंमलबजावणी संबंधी कोणतेही निर्देश अद्याप दिलेले नाहीत, अशी माहिती नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी दिली.

‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान’ – ‘नीरी’च्या हीरक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला हॉटेल रेडिसन ब्लु येथे झालेल्या पत्रपरिषदेत ‘वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद’ – ‘सीएसआयआर’चे संचालक डॉ. गिरीश साहनी, ‘नीरीचे’ संचालक डॉ. राकेश कुमार आणि इतर मान्यवरांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. तसेच संस्थेच्या विविध योजना व प्रकल्पांच्या माहितीचे प्रोजेक्टरवर सादरीकरण करण्यात आले. यावेळी ‘नागपूर टुडे’ प्रतिनिधीने डॉ. राकेश कुमार यांना नागपूर शहरातील ‘नागनदी शुद्धीकरण प्रकल्प’ आणि भारत सरकारचा महत्वाकांक्षी गंगा शुद्धीकरण प्रकल्प ‘नमामि गंगे’ विषयी प्रश्न विचारले.

Advertisement
Advertisement

नागनदी शुद्धीकरण प्रकल्पाबाबत बोलताना डॉ. कुमार म्हणाले की, आमचा ऍक्शन प्लॅन (डीपीए) तयार असून आम्ही नागपूर महापालिकेला मौखिक आणि लेखीरित्या यासंबंधी कळवले आहे. तसेच यामध्ये वापरण्यात येणाऱ्या २-३ तंत्रज्ञानांची देखील माहिती आम्ही आमच्या सादरीकरणात दिली आहे. नागनदी स्वच्छ करायची असल्यास तिला येऊन मिळणाऱ्या छोट्या नाल्यांचे शुद्धीकरण व्हायला हवे. त्यामुळे प्रत्यक्ष नागनदी स्वच्छ करण्याची गरजच भासणार नाही, असा दावा सुद्धा त्यांनी केला.

Advertisement

याचे स्पष्टीकरण देताना डॉ. राकेश यांनी नीरीच्या परिसरातून वाहणाऱ्या एका नाल्याचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, हा नाला बाहेरून वाहत येतो व त्यानंतर नीरीच्या हद्दीतून पुन्हा बाहेर जातो. दरम्यान या नाल्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीने काही उपाययोजना केल्या आहेत. हे तंत्रज्ञान फुटाळा तलावाचे पाणी शुद्ध करण्यासाठी वापरलेल्या ‘फ्लोटिंग सायकल’ तंत्रज्ञानाशी मिळते-जुळते आहे.

Advertisement

याच तंत्रज्ञानाचा वापर करून आम्हाला नागनदी प्रकल्प यशस्वीरीत्या राबवायचा आहे, जेणेकरून आमच्या संस्थेच्या मानात भर पडेल. तसेच मुख्यमंत्र्यांच्या शहरातील एक यशस्वी प्रकल्प म्हणून इतरत्र आम्हाला या प्रकल्पाचे उदाहरण देता येईल, असे डॉ. कुमारांनी सांगितले.

‘नमामि गंगे’ प्रकल्पावरील प्रश्नाचे थेट उत्तर देणे, मात्र डॉ. राकेश कुमार यांनी टाळले. ‘नमामि गंगे’ प्रकल्पाच्या कार्यविषयक प्रगतीची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच चांगल्या प्रकारे देऊ शकतील असे ते म्हणाले. खरे म्हणजे डॉ. कुमार यांना प्रश्न विचारताना गडकरींच्या ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह २०१८’ मधील मुलाखती दरम्यान केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला होता.

राजदीप सरदेसाईंनी घेतलेल्या या मुलाखतीत गडकरी म्हणाले होते की, “नमामि गंगे प्रकल्पाची” सर्व निर्धारित कामे ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर मी त्यासंबंधीची संपूर्ण आकडेवारी आणि माहिती देईन.” नेमका तोच धागा पकडत डॉ. कुमार यांनी सदर प्रश्नाला सफाईने बगल दिली. एकूणच ‘घोषणा दमदार पण प्रत्यक्ष कामाच्या नावाने मात्र शंख’ हीच खरी वस्तुस्थिती आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement