Published On : Mon, Sep 25th, 2017

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी मनपा कटिबद्ध : महापौर नंदा जिचकार

Advertisement

नागपूर : मनपातील शाळांचा आणि पर्यायाने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी मनपा कटिबद्ध आहे. यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शिक्षण विभागाच्या या अभिनव उपक्रमात आपण नेहमीच सोबत राहू, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

मनपाच्या शिक्षण विभागातर्फे महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे गणित व विज्ञान विषयांच्या शिक्षकांसाठी सोमवारी (ता. २५) एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मंचावर शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, शिक्षण समिती सदस्य राजेंद्र सोनकुसरे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार आणि कार्यशाळेतील प्रमुख वक्ते सेंटर फॉर सायंटिफिक लर्निंगचे संचालक डॉ. विवेक वाघ उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या आवडीचे बनायला हवे. हसतखेळत शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होते. यासाठी शिक्षकांचे मनोबल उंचावणे आणि त्यांच्या बदलत्या शिक्षण पद्धतीप्रमाणे प्रशिक्षण देणेही गरजेचे असते. याच उदात्त हेतूने शिक्षण विभागाच्या वतीने आता प्रत्येक विषयांसाठी अशा कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून यासाठी आपले संपूर्ण सहकार्य असल्याचे सांगितले.

शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, मनपाचा शिक्षण विभाग आता कात टाकत आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांच्या तुलनेत मनपाचे शिक्षक आणि विद्यार्थी कमी राहू नये यासाठी त्यांचे ‘अपग्रेडेशन’ वेळोवेळी करण्याचा आम्ही आता संकल्प केला आहे. हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठीच अशा कार्यशाळा सुरू केल्या आहेत. यानंतर झोनस्तरावर अशा कार्यशाळा घेण्याची आखणी करीत असून या माध्यमातून मनपाच्या शिक्षण विभागाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विषद केली. त्यानंतर प्रमुख वक्ते डॉ. विवेक वाघ यांनी त्यांच्या प्रकल्पाविषयी माहिती देत गणित आणि विज्ञान विषयांशी संबंधित अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. संवादाच्या माध्यमातून त्यांनी उपस्थित शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये या विषयांविषयीची गोडी कशी निर्माण करायची, याबाबत विस्तृत विवेचन केले.

कार्यक्रमाचे संचालन श्रीमती गीता दांडेकर यांनी केले. आभार शाळा निरीक्षक प्रीती बंडेवार यांनी मानले. कार्यक्रमाला सहायक शिक्षणाधिकारी कुसुम चाफलेकर यांच्यासह सर्व शाळा निरीक्षक, गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.