Published On : Thu, Apr 23rd, 2020

यवतमाळमध्ये एकाच दिवशी ९ पॉझिटिव्ह,नागपुरात आतापर्यंत ९८

नागपूर : राज्यात पुणे, मुंबईनंतर विदर्भातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या जिल्ह्यात आतापर्यंत २७ रुग्णांची नोंद झाली असून विदर्भात ही संख्या १७२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, सलग सात दिवसांपासून पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होणाऱ्या नागपुरात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही.

नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) प्रयोगशाळेत आज ५८ नमुने तपासले. यातील ३८ नमुने निगेटिव्ह आले. उर्वरित २० नमुन्यांमधून यवतमाळ जिल्ह्यातील नऊ नमुने पॉझिटिव्ह आले. यात ४५, ३५, २४ वर्षीय महिला व ५७, ५२, ३७, ३६, २४ वर्षीय पुरुष व १५ वर्षीय मुलाचा समावेश आहे. ११ नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले.

नागपुरात गेल्या २२ दिवसांमध्ये ८२ पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ९८ वर पोहचली आहे. यातील १५ रुग्ण बरे झाले असून एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६ आहे. यातील सात रुग्ण बरे झाले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


बुलडाणा जिल्ह्यात २१ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील एकाचा मृत्यू तर आठ बरे झाले आहेत. विशेष म्हणजे, आज या जिल्ह्यातील नमुन्यांच्या प्राप्त झालेल्या अहवालात १० ही नमुने निगेटिव्ह आले. अमरावती जिल्ह्यात आठ रुग्ण व तीन मृत्यूची नोंद आहे. गोंदिया व वाशिम जिल्ह्यात एक-एक रुग्णाची नोंद असून गोंदिया जिल्ह्यातील बाधित रुग्ण बरा झाला आहे.