Published On : Thu, Apr 23rd, 2020

मेयो : तब्बल २१ व्या दिवशी नमुने निगेटिव्ह

Advertisement

नागपूर : कोरोनामुक्त होऊन गुरुवारी मेयो रुग्णालयातून घरी गेलेल्या ४४ व्यक्तीचे नमुने सलग चार वेळा पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पहिल्यांदाच घडले. परंतु डॉक्टरांच्या चमूने हार मानली नाही. मल्टीव्हिटॅमिन सुरू केले. रुग्णांकडून प्रतिसाद मिळाला आणि तब्बल २१ व्या दिवशी नमुने निगेटिव्ह आले. या घटनेने डॉक्टरांचे मनोबल उंचावले. रुग्णालयातून घरी जाताना रुग्णाच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होता. एम्प्रेस सिटी येथील रहिवासी असलेला हा रुग्ण दिल्ली येथील प्रवासावरून नागपुरात आला. दोन आठवडे घरीच होता.

ताप, खोकला ही लक्षणे असल्याने तपासणीसाठी मेयोत आला. येथील डॉक्टरांनी त्याच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. हा रुग्ण ज्या रेल्वेतून नागपुरात आला त्याच रेल्वेत खामल्यातील पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे समोर आले. त्यांनी कोरोना संशयित म्हणून तातडीने रुग्णाला दाखल केले. २९ मार्च रोजी नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. औषधोपचाराला सुरुवात झाली. परंतु १०, १४ व १८ एप्रिल रोजी नमुने तपासले असता तिन्ही नमुने पॉझिटिव्ह आले.

औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. तिलोत्तमा पराते, डॉ. राखी जोशी, डॉ. मृणाल हरदास व डॉ. पांढरीपांडे यांनी याचा बारकाईने अभ्यास केला. औषधोपचारात मल्टीव्हिटॅमिनचा डोज वाढविला. रुग्णानेही स्वत:कडून योग व आयुर्वेदिक औषधोपचार सुरू केला. आणि २१ दिवशी २४ तासाच्या अंतराने घेतलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. डॉक्टरांच्या या कार्याचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याह डॉ. रवी चव्हाण, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी कौतुक केले. बाधित रुग्णानेही सर्व डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवकांच्या कार्याची स्तुती करीत आभार मानले. मेयो रुग्णालयातून बरा झालेला हा सातव रुग्ण होता. नागपुरातील बाधित ९८ रुग्णांमधून आतापर्यंत १५ रुग्ण बरे झाले आहेत.

२ मुली २२ दिवसानंतरही पॉझिटिव्ह
या रुग्णासोबतच २८ व २९ मार्च रोजी १२ व १७ वर्षाची मुलगी कोरोनाबधित असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही युवतीचे नमुने ७ व्या दिवशी, १४ व्या दिवशी व १८ व्या दिवशी तपासले असता पॉझिटव्ह आले आहेत. शुक्रवारी पुन्हा नमुने तपासले जाणार आहे. विशेष म्हणजे, यांचे वडिलांचे नमुने १४ व्या दिवशी निगेटिव्ह आले. परंतु मुलींना रुग्णालयात कसे एकटे सोडणार या विचाराने ते रुग्णालयातून घरी गेले नाही.

अन्यथा अनर्थ झाला असता
२८ मार्चच्या पूूर्वीपर्यंत केवळ परदेशातून आलेल्या व्यक्तींचे नमुने तपासा असे आदेश होते. मात्र, या रुग्णाकडून जी माहिती काढून घेतली आणि त्याचवेळी जो निर्णय घेतला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर या रुग्णाला घरी पाठविले असते तर आज बाधित रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ झाली असती.

-डॉ. सागर पांडे उपवैद्यकीय अधीक्षक, मेयो