मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांमध्ये अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी अपघाताच्या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात न आल्याबद्दल खंत व्यक्त केली होती. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या अपघातावरून राजकारण करू नये, असं आवाहन केलं. या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया देत सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं.
रोहित पवार म्हणाले, सुनेत्रा पवार यांनी केलेलं विधान माझ्याबद्दल नव्हतं. मी त्याच परिवारात जन्माला आलो आहे. मीदेखील पवार आहे. जे गेले ते माझे काका आहेत. पुतण्या काकांसाठी लढतोय. त्यांच्या अपघाताचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, हीच माझी मागणी आहे. जे स्वतःला दादांचे मित्र म्हणायचे, ते त्यांना न्याय मिळावा म्हणून लढत नाहीत. आमची मागणी कोणाला अयोग्य वाटत नसेल तर ते त्यांना लखलाभ. मला जे योग्य वाटतं ते मी बोलतो आणि करतो. मी तेच करणार. सुप्रियाताई योग्यच बोलल्या, असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरही भाष्य-
विक्रम काकडे आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. यावरही रोहित पवारांनी भाष्य केलं. “त्यांना बांधकाम व्यवसाय सोडून वेगळं काही कळतं का? या लोकांसमोर पवारसाहेब राजकारणाशी संबंधित चर्चा करणार का? एवढी परिपक्वता त्यांच्यात आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सीईटी सेलवर रोहित पवारांचे गंभीर आरोप-
दरम्यान, सीईटी सेलच्या कामकाजावरूनही रोहित पवारांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, सीईटी सेलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत अनेकदा अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. ‘एज्युस्पार्क’ नावाच्या कंपनीबाबतही अधिकाऱ्यांकडे तक्रारी मांडण्यात आल्या; मात्र समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यांनी पुढे आरोप केला की, टीसीएसला तांत्रिक निविदेत चांगले गुण मिळूनही कंत्राट देण्यात आलं नाही. तसेच मेरिटेक कंपनीला काम न देण्याचा निर्णय आधी झालेला असतानाही तिला कंत्राट देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
साडेचार लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याचा दावा-
“सीईटी सेलचा डेटा लीक झाला आहे. साडेचार लाख विद्यार्थ्यांचा डेटा बाहेर गेला होता. शिंगारे सर यांनी हा डेटा सीईटी सेलला दिला असून, सेलनेही हा डेटा प्रसारित झाल्याचं मान्य केलं आहे,” असा दावा रोहित पवारांनी केला.
या प्रकरणी ते आझाद मैदान पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. “पोलीस गरीब विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहतात का, हे आता पाहणार आहोत. सीईटी सेल सध्या भ्रष्टाचार, शोषण आणि वसुलीचं केंद्र बनलं आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
रोहित पवारांनी ‘एज्युस्पार्क’ कंपनीच्या व्यवहारांबाबतही प्रश्न उपस्थित करत संबंधित व्यक्ती एकमेकांच्या कंपन्यांमध्ये संचालक असल्याचा आरोप केला. तसेच याप्रकरणी कंत्राट देणाऱ्या संबंधित नेत्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.





