
नागपूर : कृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात डीजेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांवरून वाद चिघळला आहे. दहीहंडी आयोजक आणि काही हिंदू संघटनांनी पोलिसांच्या निर्णयाला उघडपणे विरोध केला असून, “कुठल्याही परिस्थितीत डीजे वाजवणारच,” अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात पोलीस प्रशासन आणि आयोजक आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डीजेवरील निर्बंधांमुळे हिंदू सणांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. पूर्वीप्रमाणेच दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला असून, पोलिसांनी कारवाई केली तरी डीजे बंद करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, डीजे बंदीच्या मुद्द्यावर भाजपमध्येही वेगवेगळी मते समोर आली आहेत. भाजपचे माजी आमदार आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी केलेली डीजे बंदीची मागणी हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे भाजप नागपूर शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट केले. तर आमदार प्रवीण दटके यांची भूमिका ही पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
संपूर्ण राज्यात एकच नियम हवा-
दयाशंकर तिवारी यांनी डीजेवर सरसकट बंदी घालण्याऐवजी आवाजाची मर्यादा निश्चित करून नियम लागू करता आले असते, असे मत व्यक्त केले. “पोलीस आयुक्तांनी डीजेवर वर्षभर बंदी का घातली नाही? सनातनी धर्माचे सण असतानाच निर्बंध का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
वेगवेगळ्या शहरांमध्ये डीजेबाबत वेगवेगळे नियम का असावेत, असा प्रश्न उपस्थित करत संपूर्ण राज्यासाठी डीजेबाबत एकच नियम असावा, अशी मागणीही तिवारी यांनी केली.
कितीही बंदी लावा, डीजे वाजवणारच-
दरम्यान, मध्य नागपूरचे भाजप आमदार प्रवीण दटके यांनीही डीजे बंदीवरून प्रशासनाला सवाल केला आहे. “फक्त हिंदूंच्याच सणांच्या वेळी डीजे बंदी का?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलीस प्रशासनाने डीजे बंदीसंदर्भातील अधिसूचना तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, दटके यांच्या मतदारसंघातील प्रसिद्ध बडकस चौकात दहीहंडी उत्सवाची तयारी सुरू असून, येथे डीजे वाजवण्याची तयारी आयोजकांनी केली आहे. “तुम्ही कितीही बंदी लावा, आम्ही डीजे वाजवणारच. ज्याला कारवाई करायची आहे, त्याने यावे आणि कारवाई करावी,” अशा शब्दांत आयोजकांनी पोलिसांच्या आदेशाला आव्हान दिले आहे.
डीसीपी राहुल मदने बडकस चौकात-
या पार्श्वभूमीवर झोन क्रमांक तीनचे पोलीस उपायुक्त राहुल मदने बडकस चौकात दाखल झाले. त्यांनी दहीहंडी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली तसेच परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी आयोजकांनी डीसीपी मदने यांच्यासमोरही आपली भूमिका स्पष्ट केली. “आम्ही डीजे वाजवणार असून, आमच्या कार्यक्रमात अडथळा आणू नका,” असे आयोजकांनी सांगितले.
त्यामुळे बडकस चौकातील दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि आयोजकांच्या आक्रमक भूमिकेवर काय कारवाई होते, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. डीजे बंदीचा मुद्दा आता केवळ प्रशासकीय निर्णय न राहता राजकीय आणि सामाजिक वादाचा केंद्रबिंदू ठरत असल्याचे चित्र आहे.




