
नागपूर – नागपुरातील जरीपटका परिसरात किराणा दुकानात साखर घेण्याच्या बहाण्याने 65 वर्षीय दुकानदाराच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा जरीपटका पोलिसांनी अवघ्या चार दिवसांत छडा लावला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपीसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून चोरीची सोनसाखळी आणि गुन्ह्यात वापरलेले वाहनही जप्त करण्यात आले आहे.
ही घटना जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुगत नगर परिसरात घडली. 26 ऑगस्टच्या रात्री 65 वर्षीय राकेश गुप्ता हे त्यांच्या किराणा व दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या दुकानात उपस्थित होते. याचवेळी एक तरुण दुकानात आला आणि एक किलो साखर देण्यास सांगितले.
गुप्ता हे साखर मोजण्यात व्यस्त असताना आरोपीने संधी साधत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळीवर झडप घातली आणि ती हिसकावून दुकानाबाहेर पळ काढला. दुकानदाराने आरोपीचा पाठलाग केला. मात्र, दुकानाबाहेर आधीच तयार असलेल्या साथीदाराच्या वाहनावर बसून आरोपी फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले. त्याचदरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली.
सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेले धागेदोरे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी निखेत बागेश्वर याच्यासह एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि सुमारे एक तोळा वजनाची सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे. या सोनसाखळीची किंमत सुमारे 1 लाख 20 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, दोन्ही संशयितांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, या चोरीच्या घटनेव्यतिरिक्त आणखी काही गुन्ह्यांत त्यांचा सहभाग आहे का, याचा तपास केला जात आहे.




