Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Feb 26th, 2019

  स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही हयगय केली जाणार नाही : महापौर नंदा जिचकार

  महापौर आपल्या दारी’ मधील समस्यांचा घेतला आढावा

  नागपूर : आज स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण देशात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेच्या बाबतीत नेहमीच गांभीर्य दाखविले आहे. स्वच्छता हा विषयच प्रत्येकाने जबाबदारीने व गांभिर्याने घेण्याचा आहे. याचीच प्रचिती नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता कर्मचा-यांचे पाय धुतले यावरून येते. स्वच्छता हेच प्राधान्य असायला पाहिजे व त्याबद्दल कोणतिही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी दिला.

  पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या झोननिहाय ‘जनसंवाद’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत झोन क्र. १ ते ७ मधील समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात सोमवारी (ता.२५) महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महापौर बोलत होत्या.

  बैठकीत विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, हनुमान नगर झोन सभापती रूपाली ठाकुर, गांधीबाग झोन सभापती वंदना येंगटवार, सतरंजीपुरा झोन सभापती यशश्री नंदनवार, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, अमीन अख्तर, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, महेश मोरोणे, अशोक पाटील, राजु भिवगडे, हरीश राउत, स्मिता काळे, सुवर्णा दखणे उपस्थित होते.

  यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत लक्षात आलेल्या समस्या व त्यावर अधिका-यांना निर्देश दिल्यानंतर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा झोन मधील समस्यांच्या निराकरणासंदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल सातही झोनच्या सहायक आयुक्तांनी यावेळी महापौरांकडे सादर केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमामध्ये लक्षात आलेल्या राज्य शासनाच्या अखत्यारितल्या समस्यांसंदर्भात कार्यवाहीसंदर्भात तयार करण्यात आलेल्या प्राकलनाची माहितीही यावेळी महापौरांकडे सादर करण्यात आली.

  संपूर्ण शहरात स्वच्छता, सफाई कर्मचा-यांची कमतरता, मोकाट कुत्रे, डुक्कर आदींची समस्या आहे. स्वच्छता हा आपला दैनंदिन विषय आहे. त्यामुळे यासंबंधी नियमीत कार्यवाही होणे आवश्यक आहे. दररोज स्वच्छता कर्मचा-यांनी जबाबदारीने आपले कर्तव्य बजावावे, यासाठी संबंधित अधिका-यांकडून योग्य वचक असणेही आवश्यक आहे. स्वच्छतेचा थेट प्रभाव नागरिकांच्या आरोग्यावर पडतो. त्यामुळे प्रत्येक झोनमधील सफाई कर्मचा-यांच्या कामावर झोनल अधिका-यांची देखरेख असणे आवश्यक आहे. नागरिकांना ओला व सुका कचरा विलग करण्याची सवय लावणे. स्वच्छतेबाबत नागरिकांच्या कोणत्याही प्रकारच्या तक्रारी राहू नयेत यासाठी प्रत्येक वस्त्यांमध्ये कार्यरत सफाई कर्मचा-यांच्या नावाचे फलक तसेच वस्तीमध्ये सफाई कर्मचा-यांचे हजेरी रजिस्टरबाबत योग्य अंमलबजावणी करणेही गरजेचे आहे. याशिवाय नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ दखल घेउन स्वच्छतेबाबत कामचुकारपणा करणा-या सफाई कर्मचा-यांसह झोनल अधिका-यांवर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिला. विशेष म्हणजे, ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत महापौर नंदा जिचकार यांच्या दौ-यानंतर झोनमध्ये स्वच्छतेच्या तक्रारी कमी झाल्या असून नागरिकांच्या समस्यांचे समाधानही झाले असल्याचे यावेळी सर्व झोनच्या सभापतींनी सांगितले.

  मोकाट कुत्रे व डुकरांच्या समस्यांमुळे संपूर्ण शहरातील नागरिक त्रस्त आहेत. डुकरांना पकडून शहराबाहेर सोडण्यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही पूर्ण झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक झोनमध्ये यासंदर्भात तातडीने कारवाई करणे तसेच मोकाट कुत्र्यांच्या बाबतीतही लवकरच आवश्यक कार्यवाही पूर्ण करून याबाबत नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

  ‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत विविध झोनमधील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये पाण्याची समस्या सर्वच स्तरातून पुढे होती. कुठे अशुद्ध पाणी तर कुठे पाणी पुरवठ्याची वेळ योग्य नसल्याची तक्रार नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. यासंदर्भात कार्यवाही संदर्भात महापौरांनी निर्देश दिल्यानंतर आजघडीला विविध भागात पाण्याच्या समस्यांपासून नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी पाणी पुरवठ्याची वेळ वाढवून देण्यात आली. अशुद्ध पाणी पुरवठा होणा-या ठिकाणी अशुद्ध पाणी पुरवठ्याचे कारण शोधून त्यावर उपायाबाबत योग्य अंमलबजावणी करण्यात आल्याचे अधिका-यांच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. महापौरांच्या समक्ष मांडण्यात आलेल्या पाण्याच्या समस्यांबाबत सुटका मिळाल्याचे यावेळी झोन सभापतींनीही सांगितले. शहरातील अनेक भागांमध्ये अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी असतात. नागरिकांना पिण्याचे अशुद्ध पाणी पुरवठा करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना शुद्ध पाणी पुरवठा व्‍हावा यासाठी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले.

  इंडियन जिमखानालबतच्या निर्माणाधिन इमारतीच्या बेसमेंटमध्ये पाणी जमा होत असल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव, दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे महापौरांच्या दौ-यात निदर्शनास आले. इंडियन जिमखानालबतच्या निर्माणाधिन इमारतीसंदर्भात प्रशासनाकडून तातडीने दखल घेउन बेसमेंटमधील खड्डा बुजविण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. खामला येथील संचयनी कॉम्प्लेक्सच्या निर्माणाधिन इमारतीचीही हीच अवस्था असल्याने नागरिकांकडून अनेकदा निवेदन देण्यात आले. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने प्रशासनाकडून वेळोवेळी पाणी काढण्याची कार्यवाही करण्यात येते. बेसमेंटमधील पाण्यामुळे परिसरातील बालक, महिला, नागरिकांना विविध आजारांचा धोका आहे. यासाठी यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेउन या इमारतीचेही बेसमेंट बुजविण्याबाबत कार्यवाही करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देश दिले.

  नंदीग्रामच्या कामाला गती द्या
  शहरातील गायी, म्हशी पालकांमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या गायी, म्हशी पालकांसाठी वाठोडा येथे वेगळे नंदीग्राम विकसीत करण्यात येत असून याबाबत आवश्यक ती कार्यवाही पूर्ण झाली असल्याचे संबंधित अधिका-यांनी यावेळी सांगितले. या कार्याला लवकरात लवकर गती देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी आयुक्तांना दिले. याशिवाय शहरातील विविध झोपडपट्ट्या या गडर लाईनवर आहेत. मात्र आता सर्व झोपडपट्ट्यांना पट्टे वितरीत करण्यात येत असल्याने सर्व रहिवासींना योग्य सुविधा मिळणे आवश्यक आहे. सर्व झोपडपट्टी धारकांच्या सुविधेसाठी योग्य योजना तयार करण्याचेही निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

  याशिवाय नाल्याचे बांधकाम, पडकी भिंत दुरूस्तीबाबत अनेक तक्रारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमात करण्यात आल्या. यासंदर्भात राज्य शासनाकडे देण्यात आलेल्या प्राकलनातून संबंधित काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145