Published On : Thu, Nov 7th, 2019

परतीच्या पावसाने झालेले शेतीचे नुकसान एकही शेतकरी वंचित राहणार नाही : पालकमंत्री

Advertisement

-ग्रामसभा घ्या, पंचनामे ग्रामसभा तपासणार
-10860 हेक्टरवर नुकसान प्राथमिक अंदाज
-संत्रा, कापूस, सोयाबीन, धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

नागपूर: परतीच्या पावसाने गेल्या दोन महिन्यात सुमारे 32 हजार हेक्टरपेक्षा अधिक शेतातील पिकाचे नुकसान झाले असून नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहणार नाही. तसेच येत्या 11 नोव्हेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात ग्रामसभा घ्या. पंचनामे करून ग्रामपंचायतींना सर्वेक्षणाचे अहवाल सोपवा. ग्रामसभा ते अहवाल तपासतील, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांनी घेतली. या बैठकीला आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, माजी आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, आ. कृष्णा खोपडे, कृषी अधिकारी शेंडे उपस्थित होते. या संदर्भात आयोजित पत्रपरिषदेत पालकमंत्र्यांनी सांगितले की, ऑक्टोबर महिन्यात 10860 हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, धान, संत्रा या पिकांचे नुकसान झाले असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे 21953 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. यापूर्वी जुलैमधील पावसाने 3993 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची आकडेवारी कृषी विभागाने या बैठकीत सादर केली.

येत्या 11, 12 व 13 नोव्हेंबरला जिल्ह्यातील 778 ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा घेऊन प्रशासनाने केलेले सर्वेक्षणाचे अहवाल ग्रामसभेत द्या. ग्रामसभा ते अहवाल तपासतील. या ग्रामसभांना लोकप्रतिनिधी, तलाठी, कृषी सहायक हजर राहतील. त्यानंतर तहसिलदार, कृषी विकास अधिकारी हे अहवाल अंतिम करतील व त्या अहवालाची प्रत आमदारांना देतील. शेवटी उपविभागीय अधिकार्‍यांनी सर्वेक्षणाचे हे अहवाल तपासून 15 नोव्हेंबरपर्यंत शासनाला पाठविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. प्रत्येक सर्वेक्षणावर कृषी सहायक, तलाठी आणि सरपंचाची स्वाक्षरी असली पाहिजे.

काटोल नरखेड भागातील संत्र्याच्या पिकाचे नुकसान किती झाले, याचे सर्वेक्षणच कृषी विभागाने केले नाही. मात्र शेतकर्‍यांनी 90 टक्के संत्रा आणि कापसाचे पीक नष्ट झाल्याचा दावा केला आहे. तहसिलदार, कृषी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. शेतकर्‍यांना मदत करण्याची शासनाची भूमिका आहे., असे सांगताना पालकमंत्री म्हणाले- 51 हजार हेक्टरवरील शेतकर्‍यांनी पीक विमा काढला असून प्रत्येक ग्रामपंचायतीत पीक विमा कंपनीच्या समन्वयकाचे नाव व मोबाईल नंबर ग्रामपंचायतीत फलकावर लावण्यात येईल. त्यामुळे पीक विमा कंपनीचा समन्वयक कोण आहे, याची माहिती शेतकर्‍यांना मिळेल. येत्या 2-3 दिवसात असे फलक लावण्याचे कृषी विभागाने यावेळी सांगितले.

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 1 लाख 29 हजार शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजार ़रुपयांचा लाभ मिळणार आहे. 39 हजार शेतकर्‍यांना पहिला ह्प्ता मिळाला आहे. एकही शेतकरी नुकसानापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. रबीच्या हंगामासाठी 15000 क्विंटल हरबरा आणि 6 हजार क्विंटल गव्हाचे लक्ष्य आहे. पण 5 हजार क्विंटल गहू हरबरा अनुदानातून देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून आली आहे, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले.

महायुतीचेच सरकार येणार : पालकमंत्री बावनकुळे

राज्यात भाजपा-सेना महायुतीचे सरकारच पुन्हा सत्तारुढ होणार असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भाजपा कोअर ग्रूपचे नेते महायुतीची सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घेत आहेत. महायुतीने एकत्रित निवडणुका लढल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असेही ते म्हणाले.

सन 1992 पासून मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. पक्षाने आजपर्यंत जी जबाबदारी मला दिली, ती मी यशस्वीपणे पार पाडली. यापुढेही जी जबाबदारी मिळेल, ती मी पार पाडीन. कुणाकडून कोणतीच ऑफर मला आली नाही, पण अशा अफवा पसरविणार्‍याचे स्वप्न पूर्ण ़होणार नाही. सत्तास्थापनेचा तिढा उद्यापर्यंत सुटेल कारण 12 कोटी जनतेच्या भविष्याचा हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.