सावंतवाडी – शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी आता राजकारणातून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. नुकतेच गंभीर आजारातून सावरल्यानंतर त्यांनी सावंतवाडीत 13 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करत पुन्हा जनसेवेत सक्रिय हजेरी लावली. मात्र याच कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे
आता निवडणूक लढवायची इच्छा नाही. पदाला चिकटून राहणं माझं स्वभावात नाही, असे सांगत केसरकरांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले.
माझं उरलेलं आयुष्य जनतेसाठी-
गेल्या काही दिवसांत त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृतीत सुधारणा होताच ते पुन्हा मैदानात उतरले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं,जनतेच्या आशीर्वादाने मला दुसरं आयुष्य मिळालंय. आता हे आयुष्य पूर्णतः समाजासाठी समर्पित करणार आहे.
राजकीय चर्चांना पूर्णविराम-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुडाळमधील आभार सभेला अनुपस्थित राहिल्याने केसरकर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यांनी स्पष्ट केलं की अनुपस्थितीचं कारण फक्त आजारपण होतं.मी नाराज नाही, अडीच वर्ष मंत्रीपद भूषवलं, समाधानी आहे. इतरांनाही संधी मिळायला हवी, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रमाणे वाटचाल-
रुग्णवाहिका लोकार्पणाच्या कार्यक्रमात बोलताना केसरकर म्हणाले, राजकारण हे मतांसाठी नसावं, माणसांसाठी असावं. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण, हाच बाळासाहेब ठाकरे यांचा मंत्र होता आणि त्याप्रमाणेच मी काम करत राहणार आहे.