नागपूर– महानगरपालिकेने (मनपा) शहरातील महसूल वाढवण्यासोबतच नागरी पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत शहरात ९ नवीन बाजारपेठा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापैकी सहा बाजारपेठांचा विकास महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) कडून करण्यात येणार आहे, तर उर्वरित तीन बाजारांची जबाबदारी थेट महापालिकेकडे असणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी शुक्रवारी कॉटन मार्केट परिसरातील प्रस्तावित नव्या बाजार स्थानाचा आणि बंद पडलेल्या मनपा शाळेचा प्रत्यक्ष दौरा करून पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत वरिष्ठ अधिकारी आणि अभियंतेही उपस्थित होते.
या बाजारपेठांचा होणार विकास-
एमएसआयडीसीमार्फत विकसित होणाऱ्या बाजारात कॉटन मार्केट, संतरा मार्केट, नेताजी मार्केट, इतवारी मार्केट, दही बाजार आणि डिक हॉस्पिटल मार्केट यांचा समावेश आहे. तर, बुधवारी बाजार, भांडेवाडी बाजार आणि गणेशपेठ बाजार यांचा विकास थेट महापालिकेच्या माध्यमातून केला जाणार आहे.
या सर्व प्रकल्पांसाठी मास्टर प्लानिंग फ्रेमवर्क (DPR) तयार करण्यात आला असून, त्याअनुषंगाने कामांना गती देण्यात येत आहे.
आरआरआर प्रकल्पावर नाराजी, तातडीने साफसफाईचे आदेश
आयुक्त चौधरी यांनी टोल प्लाझा क्रमांक १३ च्या मागे नाल्यालगत असलेल्या जुन्या मनपा इमारतीचेही निरीक्षण केले. येथे सध्या ‘रिड्यूस, रीयूज आणि रीसायकल (RRR)’ प्रकल्प सुरू आहे. मात्र परिसरात कचऱ्याचा ढिग साचलेला आढळल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि तातडीने साफसफाईचे आदेश दिले.
तसेच, परिसरातील नाल्यांची स्थिती पाहूनही असमाधान व्यक्त करत त्यांनी स्वच्छतेसाठी संबंधितांना सक्त निर्देश दिले.
संतरा मार्केटमधील रस्ता विकास योजनांची पाहणी-
त्यानंतर आयुक्तांनी संतरा मार्केटतील मारवाडी चाल येथे प्रस्तावित विकास योजना (DP रोड) याची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना संबंधित माहिती सादर करण्याचे निर्देश दिले. या दौऱ्यात भू-संपदा अधिकारी पंकज पराशर, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार, विद्युत ढेंगले आणि सुरेश खरे यांचाही समावेश होता.