नागपूर – महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसकडून हिंदी जबरदस्तीने लादली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीवर आघात होत असल्याचा दावा करत मनसेने याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, “मराठी भाषेबाबत कोणतीही तडजोड होणार नाही. मात्र राष्ट्रीय स्तरावर हिंदीचा उपयोग होत असल्याने ती शिकणं गरजेचं आहे.”
चुकीच्या शब्दप्रयोगावर स्पष्टीकरण-
हिंदीला राष्ट्रभाषा म्हटल्याच्या त्यांच्या विधानावर टीका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं, “काल मी हिंदीला राष्ट्रभाषा म्हणालो, मात्र ती चूक होती. हिंदी ही राष्ट्रभाषा नसून राजभाषा आहे. माझ्या विधानावरून अनावश्यक राजकारण सुरू आहे.”
मराठी भाषेवर प्रीती, पण हिंदी आवश्यक-
बावनकुळे पुढे म्हणाले, मराठी ही आपली ओळख आणि अभिमान आहे. ती जपली पाहिजे. पण भारतात वेगवेगळ्या राज्यांत फिरताना हिंदी ही एक सामान्य संवादाची भाषा म्हणून उपयोगी पडते. त्यामुळे ती शिकणं अपरिहार्य आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदीचा समावेश असणं योग्य-
राष्ट्रीय शिक्षण धोरणाविषयी बोलताना ते म्हणाले, “या धोरणात हिंदीचा समावेश आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय टीका, विरोध आणि गदारोळ टाळावा. मातृभाषेप्रती निष्ठा ठेवूनही आपण इतर भाषाही आत्मसात करू शकतो.
बहुतेक राज्यांमध्ये प्रशासनाचं कामकाज हिंदीत-
देशातील सुमारे 60 टक्के राज्यांमध्ये प्रशासनाचे काम हिंदी भाषेत केले जातं. त्यामुळे एक सामान्य, समजणारी भाषा म्हणून हिंदी शिकण्यात काहीही गैर नाही,” असंही त्यांनी नमूद केले.