– लोकप्रतिनिधींवर गुन्हे दाखल केल्याने संताप; हिटलरशाहीचा आरोप, अविश्वास आणणार
नागपूर- एरवी एकमेकांचे उणे-दुणे काढणारे मनपातील सत्ताधारी व विरोधी पक्षाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात मोट बांधली. सत्तापक्षनेते संदीप जाधव व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी आयुक्तांवर हिटलरशाहीचा गंभीर आरोप करीत अविश्वास आणणार असल्याचे सांगितले.
कोरोनासंदर्भातील उपाययोजना करण्याबाबत सल्ला देणारे आमदार विकास ठाकरे व नगरसेवक नितीन साठवणे यांच्यावर गुन्हे दाखल केले. महापौर, पदाधिकारी, नगरसेवकांचे न ऐकता विलगीकरणासाठी नेण्यात आलेल्या नागरिकांसोबतही वागणूक अभद्र असल्याचे नमूद करीत उभयतांनी आयुक्तांच्या कार्यशैलीवर तोफ डागली.
शहरातील विलगीकरण केंद्रातील नागरिकांची परवड, प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना कैद्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या वागणुकीवर सत्तापक्षनेते संदीप जाधव व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
व्हीएनआयटी येथे विलगीकरणासाठी आणलेल्या नागरिकांना चार तास उभे ठेवण्यात आले. विलगीकरण केंद्रात नाश्ता, जेवण वेळेवर नाही. स्वच्छता नाही, पाणी नाही अन् आयुक्त म्हणतात सारे व्यवस्थित आहे. स्वतःची पाठ थोपटून घेत आहे, असा टोला सत्तापक्षनेते संदीप जाधव यांनी मारला.
सतरंजीपुरा या भागात गेल्या दोन महिन्यांपासून सील लावण्यात आले. येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, लहान मुलांसाठी दूध आणायलाही जाऊ दिले जात नाही.
येथील नागरिकांना हीन दर्जाची वागणूक दिली जात आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी केला.
नागरिकांच्या सुविधेसाठी सल्ला देणारे नगरसेवक नितीन साठवणे यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे अशा आयुक्तांना परत पाठविणेच योग्य होईल. त्यांच्याविरोधात अविश्वास आणणार, असा सूरही त्यांनी लावला.
पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी मिळून कामे करण्याची महापालिकेची परंपरा आहे. मात्र, आयुक्तांची कार्यशैली हिटलरशाहीप्रमाणे आहे. महापौर व इतर पदाधिकाऱ्यांना निर्णयाची माहिती देत नाही.
कुणालाही विश्वासात न घेता एककल्ली कारभार सुरू आहे. नागरिकांचा विरोध असतानाही भरवस्तीत कोविड सेंटरचे काम सुरू आहे.
– संदीप जाधव, सत्तापक्षनेते, महापालिका.
दाट वस्तीत कोविड सेंटर उभारण्यास आमदार विकास ठाकरे यांनी विरोध केला तर त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला.
नगरसेवक साठवणे यांच्यावरही गुन्हा नोंदविला.
विलगीकरणातील नागरिकांना कैद्यासारखी वागणूक दिली जात आहे.याबाबत पालकमंत्री डॉ.नितीन राऊत तसेच पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे आयुक्तांची तक्रार केली.मुख्यमंत्र्यांकडेही तक्रार करणार.
– तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते, महापालिका.











