नागपूर : उत्तर भारतीयांचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्हासात साजरा केला जातो. यासाठी अंबाझरी आणि फुटाळा तलाव येथे मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येतात. भाविकांसाठी दरवर्षी नागपूर महानगर पालिकेच्या वतीने सोयी सुविधा पुरविण्यात येतात व सुरक्षेच्या दृष्टीने तयारी करण्यात येते. यावर्षी २ व ३ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणाऱ्या उत्सवानिमित्त करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची पाहणी महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी (ता. २९) केली.
यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी उपस्थित होते.
बहुराष्ट्रीय छठ पूजा व्रत समितीच्या वतीने महानगर पालिकेच्या सहयोगाने सदर आयोजन करण्यात येते. हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये याची काळजी मनपाच्या वतीने घेण्यात येते.
पावसामुळे अंबाझरी तलाव परिसरात गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ते गवत कापण्यात यावे आणि भाविकांना सोयीचे व्हावे यासाठी स्वामी विवेकानंद स्मारकाच्या बाजूने तलावापर्यंत येण्यासाठी सुरक्षित रस्ता तयार करण्याचे निर्देश यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिले. फुटाळा तलावावरही भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्था करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे आणि ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी दिलेत. यावेळी नगरसेविका रूपा राय, नगरसेवक कमलेश चौधरी, पं. अशोककुमार शुक्ला, शैलेंद्र अवस्थी, छठ पूजा व्रत समितीचे संस्थापक अध्यक्ष शेखर राय, ब्रजभूषण शुक्ला, प्रा. बद्रीप्रसाद पांडे, अमोल कोल्हे, संजय शर्मा उपस्थित होते.
