Published On : Wed, Apr 25th, 2018

महापौरांनी जाणून घेतल्या नगरसेवकांच्या पाणी समस्या

Mayor Drinking Water

नागपूर: पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. नागरिकांना दूषित पाणी मिळत असल्याने नागरिक वारंवार तक्रार करीत आहे. असे असूनदेखिल ओसीडब्ल्यूने समस्या न सोडविल्याने महापौर नंदा जिचकार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

नागपूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या निर्णयानुसार जलप्रदाय समितीच्या झोननिहाय बैठकीअंतर्गत बुधवारी (ता.२५) सतरंजीपुरा झोन कार्यालय येथे नगरसेवकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, उपसभापती श्रद्धा पाठक, नवनिर्वाचित झोन सभापती यशश्री नंदनवार, माजी सभापती संजय चावरे, नगरसेविका आभा पांडे, अभिरूची राजगिरे, शकुंतला पारवे, विरंका भिवगडे, नगरसेवक संजय महाजन, रमेश पुणेकर, शेषराव गोतमारे, नितीन साठवणे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी महापौरांनी झोनमधील प्रभागांचा आढावा घेतला. झोनमध्ये नियमित टॅंकर येत नाही. सकाळी टँकरची मागणी केल्यानंतर रात्री टँकर येतो यामुळे स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याने नागरिक नगरसेवकांकडे तक्रार करीत आहे, अशा तक्रारी नगरसेवकांनी महापौरांसमोर मांडल्या. यावर महापौरांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना खडसावून त्यांना नागरिकांच्या पाण्याच्या समस्या सोडविण्यात याव्या आणि नगरसेवकांच्या सूचनेनुसार नियमित पाणी पुरवठा करण्याचे निर्देश दिले.


गढूळ पाण्याच्या समस्येबाबतही नगरसेवकांनी तक्रार केली. पाण्याचे नमुने सभापती संजय चावरे यांनी बैठकीत आणून महापौरांना दाखविले. यावर महापौर नंदा जिचकार यांनी संताप व्यक्त करत १५ दिवसाच्या आत झोनमधील सर्व समस्या सोडविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यानंतरही कामे झाली नाही तर ओसीडब्ल्यूवर दंड आकारण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी नगरसेवकांना दिले. यासाठी सातत्याने स्थानिक नगरसेवकांसोबत समन्वय साधावा, अशा सूचना केल्या. पावसाळा सुरू होण्यापूर्वी झोनमधील सर्व विहिरी स्वच्छ करण्यात याव्यात, त्यातील गाळ काढून त्याठिकाणी नेटवर्क तयार करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.

यावेळी जर ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांकडून कामे झाली नाही तर त्याची तक्रार माझ्याकडे करावी, मी ती तक्रार २४ तासाच्या आत सोडवेन, असे आश्वासन जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके यांनी दिले. सतरंजीपुरा झोनचा काही भाग लकडगंज झोन व आसीनगर झोनमध्ये समाविष्ट केला आहे. टँकरची मागणी केली असता काही भागात लकडगंज व आसीनगर झोनमधून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे टँकर येण्यास उशीर होतो, त्यामुळे जो भाग जवळ असेल त्या ठिकाणांवरुन पाणी पुरवठा करण्यात यावा आणि टँकरची संख्यासुद्धा वाढवण्यात यावी, असे निर्देश सभापती पिंटू झलके यांनी दिले.

Mayor Drinking Water

यावेळी उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने बोलताना म्हणाले, पिण्याचे पाणी मिळणे हा नागरिकांचा मुलभूत अधिकार आहे. त्याचे हनन होता कामा नये. ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक नगरसेवकांनी समन्वय साधून झोनमधील समस्या तातडीने सोडव्यावात. दूषित पाण्यासारखा गंभीर प्रश्न झोनमध्ये आहे, त्यावर त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीला निगम सचिव हरिश दुबे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, ओसीडब्ल्यूचे राजेश कालरा, प्रवीण शरण यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.