नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितिन नबीन यांची निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन करत महत्त्वपूर्ण भाष्य केले. “मी स्वतःला आजही भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता मानतो. नितिन नबीन हे आता आपले सर्वांचे अध्यक्ष आहेत, म्हणजेच ते माझेही बॉस आहेत,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
दिल्लीतील भाजपा मुख्यालयात राष्ट्रीय अध्यक्षपदाची औपचारिक घोषणा झाल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नितिन नबीन यांच्यावर केवळ भाजपाचे नेतृत्व करण्याचीच नव्हे, तर एनडीएतील सर्व घटक पक्षांमध्ये समन्वय राखण्याचीही मोठी जबाबदारी आहे.
पुढील २५ वर्षे निर्णायक-
पंतप्रधान मोदी यांनी पुढील २५ वर्षांचा उल्लेख करत सांगितले की, हा कालखंड ‘विकसित भारत’ घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक टप्प्याच्या सुरुवातीलाच नितिन नबीन भाजपाची समृद्ध परंपरा पुढे नेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नितिन नबीन यांच्या साधेपणा, सहजता आणि संघटन कौशल्याचेही पंतप्रधानांनी विशेष कौतुक केले. युवा मोर्चा, विविध राज्यांतील प्रभारी पदे तसेच बिहार सरकारमधील अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याचे मोदी म्हणाले.
संगठन पर्वाचा समारोप-
भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, मागील अनेक महिन्यांपासून ‘संगठन पर्व’ अंतर्गत ही प्रक्रिया अत्यंत लोकशाही पद्धतीने, पक्षाच्या संविधानानुसार राबवली जात होती. आज या प्रक्रियेचा विधीपूर्वक समारोप झाला असून, हा कार्यक्रम भाजपाच्या लोकशाही मूल्यांचा, संघटनात्मक शिस्तीचा आणि कार्यकर्ता-केंद्रित विचारसरणीचा प्रतीक आहे.
शून्यापासून शिखरापर्यंतचा प्रवास-
अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने शून्यापासून शिखरापर्यंतचा प्रवास अनुभवला. पुढे वेंकैया नायडू, नितिन गडकरी यांसारख्या नेत्यांनी संघटन विस्तारले. राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला पहिल्यांदा स्वबळावर पूर्ण बहुमत मिळाले. अमित शाह यांच्या काळात अनेक राज्यांत भाजपाची सरकारे स्थापन झाली, तर जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात पंचायत ते संसदपर्यंत पक्ष अधिक मजबूत झाला आणि केंद्रात सलग तिसऱ्यांदा भाजपाचे सरकार सत्तेत आले.नितिन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा हा प्रवास अधिक बळकट होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.









