नागपूर : शहरातील मंदिरांमधून चोरी करणाऱ्या एका शातिर चोराला गुन्हे शाखा युनिट ६च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीने शहरातील दोन मंदिरांमध्ये केलेल्या चोरीची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखा युनिट ६चे पथक पेट्रोलिंग करत असताना कामगार नगर चौक परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. चौकशीदरम्यान त्याची ओळख सुभाष झाडे अशी झाली. तो टेलिफोन एक्सचेंज चौक येथे फुटपाथवर वास्तव्यास असून मूळचा मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुभाषला दारूचे व्यसन असून त्याच व्यसनापोटी त्याने तहसीलच्या टिमकी परिसरातील संकट मोचन हनुमान मंदिर तसेच तांडापेठ येथील हनुमान मंदिरात चोरी केली होती. या दोन्ही ठिकाणांहून त्याने चांदीचे मुकुट चोरले होते. आरोपीच्या सांगण्यावरून हे चांदीचे मुकुट पोलिसांनी जप्त केले आहेत.
या चोरीच्या घटनांमध्ये आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शहरभर शोध सुरू होता. अखेर त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी आरोपीस मुद्देमालासह तहसील पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.









