Published On : Sat, Mar 7th, 2020

हवामान विषयक माहिती अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे जनसामान्यापर्यंत पोहोचवावी

Advertisement

नागपूर : हवामान विषयक अंदाज तसेच माहिती सहज समजेल अशा स्थानिक भाषेमध्ये उउलब्ध करुन ती मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने शेतकरी व जनसामान्यांनापर्यंत पोहोचेल यारीतीने अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब या माहिती संप्रेषणामध्ये करावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केले.

स्थानिक वनामती येथील सभागृहात भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक हवामान कार्यालयाद्वारे एक दिवसीय वापरकर्ता क्षेत्रीय संमेलनाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नागपूरचे उपजिल्हाधिकारी आशिष बिजवाल, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मोहोपात्रा, प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरचे उपमहासंचालक डॉ.एम. एल. साहू. केंद्रीय भूजल मंडळ नागपूरचे संचालक डॉ.पी.के .जैन उपस्थित होते.

हवामान विषयक पूर्वसूचना ही पिकांच्या काढणी नंतरच्या प्रक्रियेमध्ये लाभदायक ठरत असल्याने पिकाचे नुकसान टळते. हवाई तसेच समुद्री वाहतुकीमध्ये पूर्वसूचना मिळाल्यानंतर संभाव्य धोका टाळला जातो. हवामान अंदाज हे शेती तसेच इतर पूरक व्यवसाय यांना सुद्धा फायदेशीर असल्याने या संदर्भातील हितधारक गावातील सरपंच ,गावकरी तसेच लोकप्रतिनिधी यांना या प्रादेशिक वापरकर्त्या परिषदेमध्ये आमंत्रीत करून त्यांना सुद्धा हवामानविषयक तंत्रज्ञान समजावून सांगावे , असे आवाहन नितीन गडकरी यांनी यावेळी केले.कृषी ,विभाग , हवामान विभाग तसेच इतर संबंधित शासकीय विभागांनी परस्परांमध्ये संवाद, सहकार्य व समन्वय साधल्यास हवामान अंदाज व त्याच्या परिणामाबाबत योग्य तो प्रतिसाद मिळून कार्यक्षमता वाढेल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.


हवामान विभागाचे महासंचालक मोहपात्रा यांनी यावेळी जिल्हा स्तरावरच्या हवामान अंदाजा पासून तालुकास्तरावरील तसेच मंडळ स्तरावरील अंदाज वर्तवणे विभागाने चालू केले असल्याचे सांगून देशातील 2000 ठीकाणी ब्लॉक फोरकास्टिंग चालू केली असल्याचे त्यांनी सांगितलं. समुद्री तसेच रोगाच्या संदर्भातील हवामानाचे अंदाज सुद्धा हवामान विभाग करत असून याचा वापर मत्स्यव्यवसाय तसेच साथीचे रोग प्रतिबंध करण्यासाठी होतो. नागपूर तसेच मुंबई येथील शहरातील हवामान विषयक अंदाज वर्तवण्या सोबतच विभागवार सुद्धा अंदाज वर्तवणे चालू केले असल्याची माहिती डॉ. मोहपात्रा यांनी यावेळी दिली,

या क्षेत्रीय वापरकर्ता संमेलनाचा हेतू भारतीय विज्ञान विभागातर्फे अवलंबिला जाणाऱ्या नव्या तंत्रज्ञान व विकास यांचा फायदा वापरकर्त्यांपर्यंत पोहचवणे हा आहे, असे प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरचे उपमहासंचालक डॉ.एम. एल. साहू यांनी स्पष्ट केले. कृषी संदर्भातील हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापनामध्ये हवामानाचे अंदाज यांची भूमिका याविषयी माहिती या एक दिवसीय संमेलनात दिली गेली. डॉपलरची कार्यपद्धती, हवामानाचे अंदाज प्राप्त करण्याची प्रक्रीया, त्यांचे वास्तव्य व महत्त्व यांची सुद्धा माहिती या कार्यक्रमात दिली गेली. याप्रसंगी हवामानविषयक विविध तंत्रज्ञाना संदर्भातील संज्ञा, व्याख्या, हवामानविषक संशोधन पद्‌धती याविषयी वैज्ञानिकांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

या संमेलनामध्ये विमानतळ, रेल्वे, रस्ते, परिवहन ,पर्यटन ,राजस्व ,सार्वजनिक स्वास्थ्य सेवा, कृषी विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन, सिंचन विभाग ,नागपूर महानगरपालिका तसेच प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासोबतच दूरसंवेदन, मृदा शास्त्र ,जलविज्ञान ,भुजल विभाग व प्रगतिशील शेतकरी त्यांचे प्रतिनिधित्व होते.