Published On : Mon, Oct 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला भाऊ जांबुवंतराव धोटे यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार: नितीन गडकरी

विजया धोटे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने भेट घेऊन सादर केले निवेदन
Advertisement

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाला भाऊ जांबुवंतराव धोटे यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करणार: नितीन गडकरी

नागपूर, : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरला विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. माजी आमदार तथा भाऊंच्या पत्नी विजया धोटे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने गडकरी यांची आज भेट घेऊन यासंदर्भात निवेदन सादर केले.

यावेळी भाऊंच्या कन्या ज्वाला जांबुवंतराव धोटे, अन्याय निवारण मंचाचे सदस्य अंजय्या अनपर्थी आणि भाजप आध्यात्मिक सेलचे महामंत्री श्री. चंद्रशेखर दुबे उपस्थित होते. विजया धोटे या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री बॅरिस्टर रामराव आदिक यांच्या कन्या आहेत.

महाराष्ट्र विधानसभेवर पाच वेळा आणि लोकसभेवर दोन वेळा निवडून आलेल्या भाऊंनी शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेसाठी त्यांनी उभारलेले ऐतिहासिक आंदोलन विदर्भाच्या शैक्षणिक आणि कृषी विकासाच्या लढ्यात महत्त्वपूर्ण ठरले. पशुवैद्यकीय शिक्षणाच्या विस्तारासाठी तसेच नागपूर येथे मुख्यालय असलेल्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या स्थापनेसाठीही भाऊंनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यांच्या कार्याशी संबंधित विद्यापीठाला त्यांचे नाव दिल्यास भावी पिढ्यांना त्यांच्या जनसेवेची आणि विदर्भाच्या विकासासाठी केलेल्या संघर्षाची प्रेरणा मिळेल, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.

यासोबतच भाऊंच्या सार्वजनिक जीवनाशी घनिष्ठ संबंध असलेल्या नागपूर आणि यवतमाळ या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एका महत्त्वपूर्ण सार्वजनिक पायाभूत सुविधा अथवा विकास प्रकल्पाला त्यांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली.

Advertisement

भाऊंच्या कार्याचा सन्मान हा त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या विचारांवर आणि कार्यावर प्रेम करणाऱ्या विदर्भातील असंख्य नागरिकांच्या भावनांना न्याय देणारा ठरेल, असे विजया धोटे यांनी निवेदनातून व्यक्त केले.
शिष्टमंडळाची मागणी ऐकून घेतल्यानंतर, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मंत्रिमंडळात निर्णय व्हावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.