
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर प्रवासी बसवणे आणि रिक्षा पार्किंगच्या मुद्द्यावरून रिक्षाचालक आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या (एमएसएफ) जवानांमध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाचीने सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळाबाहेर रिक्षा उभी करणे आणि प्रवाशांना बसवण्यावरून रिक्षाचालक व सुरक्षा जवानांमध्ये वादाची ठिणगी पडली. काही वेळातच दोन्ही बाजूंमधील वाद वाढत जाऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. एका प्रवाशासमोर ही घटना घडली. रिक्षाचालकाने संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडिओ चित्रित करून समाजमाध्यमांवर प्रसारित केला. त्यानंतर हा प्रकार चर्चेत आला.
दरम्यान, महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून, वाद नेमका कोणत्या कारणावरून सुरू झाला आणि घटनेदरम्यान काय घडले, याची पडताळणी केली जात आहे.
पोलिसांच्या तपासानंतर या घटनेतील नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.



