| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Feb 20th, 2021

  केंद्रीय अर्थसंकल्‍पाने दिला नवा दृष्‍टीकोन सुरेश प्रभू यांचे प्रतिपादन

  नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वातील सरकारने नुकताचा सादर केलेला अर्थसंकल्‍प हा अर्थव्‍यवस्‍थेतील त्रुटींना भरून काढणारा असून नवा विचार, नवी दिशा, देशाला नवा दृष्‍टीकोन आणि नवे कार्यक्रम देणारा आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्‍यक्‍त केले.

  भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सिथारमन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020 – 21 च्या निमित्ताने माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. खा. विकास महात्मे, आ. प्रवीण दटके, आ नागो गाणार, कार्यक्रमाचे अध्‍यक्ष माजी खा. अजय संचेती, अश्विन मेहाडिया, जयप्रकाश गुप्ता, कल्पना पांडे, अर्चना डेहनकर, सीए मिलिंद कानडे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
  सुरेश प्रभू म्हणाले,

  याआधीच्‍या सरकारच्‍या चुकीच्‍या धोरणांमुळे सर्वाधिक गरीब लोक आपल्‍या देशात होते. परंतु, मोदी सरकारने हे चित्र बदलण्‍याचा पुर्णपणे प्रयत्‍न केला असून ‘आम आदमी’ला डोळ्यासमोर ठेवून धोरण आखायला सुरूवात केली. देशातील नोकरीच्‍या मागे धावणा-या युवकांना स्‍टार्टअपचा मार्ग दाखवला. कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्‍य मुलभूत सुविधांमध्‍ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. कर प्रणालीत मोठ्या प्रमाणात बदल केले. बँकींग क्षेत्रात बदल घडवले. देशातील प्रत्‍येक जिल्‍ह्यातील अर्थव्‍यवस्‍थेत विकास झाला तरच देशाचा विकास होईल, याकडे मोदी सरकारने गांभीर्याने लक्ष दिले, असे सुरेश प्रभू म्‍हणाले.

  ‘सबका साथ, सबका विकास’ या केंद्र सरकारच्‍या धोरणामुळे आपली अर्थव्‍यवस्‍था सुधारेल आणि देशातील प्रत्‍येक नागरिकाला त्‍याचा लाभ होईल, असा विश्‍वास सुरेश प्रभू यांनी व्‍यक्‍त केला.

  अध्‍यक्षस्‍थानावरून बोलताना अजय संचेती म्‍हणाले, कोरोनासारख्‍या महामारीशी लढताना देशातील लोकांच्‍या सर्व गरजा पूर्ण करण्‍याचा मोदी सरकारने पुरेपुर प्रयत्‍न केला आहे. आरोग्‍य, शिक्षण, मुलभूत सुविधांच्‍या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल घडत असून त्‍याचा लाभ केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागापर्यंत पेाहोचेल.

  कार्यक्रमाचे संयोजक भाजपा आर्थिक आघाडीचे अध्यक्ष सीए मिलिंद कानडे यांनी

  प्रास्ताविक केले. ते म्‍हणाले, भाजपा सरकारने अर्थसंकल्‍पना सादर करण्‍यापूर्वी जनतेच्‍या इच्‍छा, आकांक्षा, अपेक्षा जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यासाठी अनेक सभा घेण्‍यात आल्‍या. त्‍यानंतरच अर्थसंकल्‍पला सर्वसमावेश असे स्‍वरूप प्राप्‍त झाले.
  सीए मिलिंद कानडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.

  सूत्र संचालन कांचन करमरकर यांनी केले तर अनिरूद्ध पालकर यांनी आभार मानले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145