नागपूर – नागपूर महानगरपालिकेने आगामी २० वर्षांसाठी म्हणजेच २०२५ ते २०४५ या कालावधीसाठी शहराचा नवा मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तब्बल पंचवीस वर्षांनंतर शहरासाठी पुन्हा एकदा विकास आराखडा बनवला जात असून, भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि नागरी गरजा लक्षात घेऊन हे नियोजन केले जात आहे.
या नव्या मास्टर प्लॅनमध्ये २०१३ मध्ये महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या हुडकेश्वर आणि नरसाळा या भागांचा समावेश करण्यात आला आहे. याआधीच्या २००१ च्या आराखड्यात हे भाग नव्हते. मात्र, स्मार्ट सिटी प्रकल्पात येणारे पारडी, पूनापूर, भरतवाडा, भांडेवाडी तसेच मेट्रो प्रकल्पांतर्गत विकसित होत असलेले अजनी, अंबाझरी, जयताळा, सोमलवाडा, इंदोरा, सिताबर्डी आणि मिहान हे भाग नव्या आराखड्यातून वगळण्यात आले आहेत. या भागांना स्वतंत्र विकास प्राधिकरण असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
महानगरपालिका शहराच्या एकूण विकासासाठी पायाभूत सुविधा जसे की शाळा, रस्ते, उद्याने, जलस्रोत, सांस्कृतिक केंद्रे यासाठी आवश्यक भूभाग आरक्षित करणार आहे. हे नियोजन आधुनिक GIS तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात येत असून, यामुळे शहराचा विकास अधिक शास्त्रीय आणि नियोजनबद्ध होईल.
शहराचा आराखडा तयार झाल्यानंतर तो नागरिकांसाठी प्रसिद्ध केला जाईल. त्यावर ६० दिवसांच्या आत सूचना व हरकती मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम आराखड्यासाठी मसुदा तयार केला जाईल आणि तो महापालिकेच्या सभागृहात सादर केला जाईल. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर तो राज्य शासनाच्या शहरी विकास विभागाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे.