Published On : Fri, Jun 22nd, 2018

महाराजबागजवळील नवीन डी.पी. रस्त्यावरून सुटणार ‘आपली बस’

Advertisement

नागपूर : महाराजबाग रोड आणि धीरन कन्या शाळा येथून सुटणाऱ्या शहर बसमुळे होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता मातृसेवा संघ ते महाराजबागच्या मागून अमरावती मार्गाला जोडणाऱ्या डी.पी. मार्गावरून उद्या २३ जून पासून विविध मार्गाच्या बसेस सुटतील. त्याचा शुभारंभ परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २२) करण्यात आला.

यावेळी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, लेबर अधिकारी अरुण पिपुरडे, पर्यवेक्षक रामराव मातकर, डीम्सचे टीम लीडर विनोद रत्नपारखी, डीम्सचे वाहतूक अधिकारी सुनील पशिने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.

नागपूर शहर बसचे संचलन सध्या बर्डी येथील महाराजबाग रोड, मोरभवन आणि धीरन कन्या शाळेजवळून होते. मात्र, शहर बसच्या थांब्यामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आता महाराजबाग मार्गावरून सुटणाऱ्या बस फेऱ्या नवीन डी.पी. मार्गावरून सुटतील. या मार्गावर विविध फलाट तयार करण्यात आले आहे. त्यापैकी फलाट क्र. ६ वरून विविध मार्गावरील सुमारे ११७ बसफेऱ्या आणि फलाट क्र, ७ वरून ११८ बस फेऱ्या सुटतील. परिवहन सभापतींनी बर्डी-शेषनगर आणि बर्डी-बहादुरा फाटा या बसेसना हिरवी झेंडी दाखवून या मार्गाचा शुभारंभ केला. यावेळी बोलतान सभापती बंटी कुकडे म्हणाले, नवीन डी.पी. मार्गावरून आता बस फेऱ्या जाणार असल्यामुळे महाराज बाग मार्गावरील वाहतुकीची कोंडी संपेल. आजपर्यंत नागरिकांनी जे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचे आभार. लवकरच या मार्गाला लागून नव्या शहर बस स्टॅण्डचा विकास होणार आहे. मोरभवन बस स्टॅण्डला ते जोडणार असून शहर बस सेवा अधिकाधिक लोकाभिमुख आणि प्रवाशांच्या सोयीचा करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

डी.पी. मार्गावरून सुटणाऱ्या फेऱ्या

नवीन डी.पी. मार्गावरील फलाट क्र. ६ वरून बर्डी-बहादुरा फाटा (७२ फेऱ्या), बर्डी-सुदामनगरी (आठ फेऱ्या), बर्डी-नरसाळा (११ फेऱ्या), बर्डी-न्यू नरसाळा (१३ फेऱ्या), बर्डी-रमना मार्गे मेडिकल (१३ फेऱ्या) तर फलाट क्र. ७ वरून बर्डी-पिपळा गाव मार्गे बेसा फाटा (आठ फेऱ्या), बर्डी-शेषनगर (१४ फेऱ्या), बर्डी-चक्रपाणीनगर (१५ फेऱ्या), बर्डी-वेळाहरी मार्गे बेसा फाटा (१५ फेऱ्या), बर्डी-खरसोली (चार फेऱ्या), बर्डी-अयोध्यानगर (साईमंदिर) (आठ फेऱ्या), बेसा-गोरेवाडा (४७ फेऱ्या), बर्डी-बहादुरा गाव मार्गे खरबी (सात फेऱ्या) अशा एकूण २३५ फेऱ्या सुटतील.