Published On : Fri, Jun 22nd, 2018

सिंधी विस्थापितांना मालकी हक्क तातडीने देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नागपूर: सिंधी विस्थापितांना जमिनीचे मालकी हक्क देण्याचा निर्णय स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर महाराष्ट्र शासनाने घेतला. यावर तातडीने अंमलबजावणी व्हावी यादृष्टीने नागपुरातील सिंधी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. पुढील १५ दिवसात १०० लोकांची जमीन वर्ग दोन मधून वर्ग एकमध्ये करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

मनपाच्या स्थायी समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या नेतृत्त्वात सिंधी समाजातील सर्व सहयोगी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने १६ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. ७० वर्षानंतर झालेल्या ह्या निर्णयाने सिंधी समाजात उत्साहाचे वातावरण आहे. फाळणीनंतर भारतात विस्थापित झालेल्या सिंध प्रांतातील नागरिकांना तेव्हापासून मालकीच्या जमिनी मिळाल्या नव्हत्या. सात दशकानंतर हा निर्णय झाला असल्याने आतातरी जमीन वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यास उशीर लागायला नको, या उद्देशाने १४ जूनला शासकीय आदेश निघताच १६ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने या निर्णयावर कार्यवाही करण्याची विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

त्याच अनुषंगाने सभापती वीरेंद्र कुकरेजा यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आज (ता. २२ जून) उपजिल्हाधिकारी मनीषा जायभाय यांना यासंदर्भातील निवेदन सादर करण्यात. या निवेदनावर उचित कार्यवाही करीत जिल्हाधिकारी कार्यालयातून सिंधी बांधवांच्या वर्ग दोन मधील जमिनी वर्ग एक मध्ये करण्याच्या कार्यवाहीला वेग आला आहे. पुढील १५ दिवसांत किमान १०० सिंधी बांधवांना याचा लाभ मिळेल. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळामध्ये ॲड. दिलीप दानी, प्रकाश तोतवानी, राजेश बटवानी, शंकर भोजवानी, घनश्याम गोदानी, संजय वासवानी, ॲड. कमल आहुजा यांच्यासह अन्य सिंधी बांधवांचा समावेश होता.

कागदपत्र एकत्रित करण्यासाठी शिबिर सुरू

शासकीय आदेशाचा लाभ प्रत्येक सिंधी बांधवांना व्हावा या हेतून सिंधी समाजातील विविध सहकारी संस्थांच्या सहकार्याने जरीपटका येथील बाबा हरदासराम धर्मशाला येथे सकाळी ८.३० ते १०.३० या काळात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून होत असलेल्या कार्यवाहीच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रे सदर शिबिरात जमा करण्यात येत आहे. शिवाय संबंधित विषयाची माहितीसुद्धा देण्यात येत आहे. सदर शिबीर २६ जूनपर्यंत राहणार असून सिंधी समाजबांधवांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे जमा करावी, असे आवाहन सिंधी समाजाच्या वतीने स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले आहे.