Published On : Fri, Jun 22nd, 2018

विद्यार्थ्यांची काळजी आणि सरंक्षण ही जबाबदारी शिक्षकांचीच – डॉ.वासंती देशपांडे

Advertisement

नागपूर : शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेणे आणि त्यांचे संरक्षण करणे ही जबाबदारी जेवढी पालकांची आहे, तेवढीच शिक्षकांची आहे. शालेय वेळेत पालक आपल्या पाल्याला आपल्या जबाबदारीवर सोडत असतो. त्यामुळे त्याचे संरक्षण करणे आपले कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याच्या बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य डॉ. वासंती देशपांडे यांनी केले.

नागपूर महानगरपालिकेद्वारे शुक्रवारी (ता.२२) महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे ‘विद्यार्थी सुरक्षा कायदा’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर नागपूर चाईल्ड लाईन या संस्थेच्या पूजा कांबळे, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चापलेकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना डॉ. वासंती देशपांडे म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार विद्यार्थी संरक्षण कायदा सर्वत्र लागू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात विशेष लक्ष देण्यासाठी त्यानुसार २०१७ साली परिपत्रक काढले आहे. विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही शालेय वेळेत आपलीच असते, अशी माहिती त्यांनी मुख्याधापक आणि मनपाच्या शिक्षकांना दिली.

शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काय उपाययोजना करावयाच्या याची माहिती डॉ.वासंती देशपांडे यांनी पीपीटीद्वारे दिली. शाळेच्या सर्व माध्यमांमध्ये व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यामिक, उच्च माध्यामिक शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्यात यावी, शाळा व्यवस्थापनाने शाळेच्या सर्व प्रवेशद्वारांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, याशिवाय प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा, अशीही सूचना त्यांनी केली.

विद्यार्थी कोणत्याही दबावाला बळी पडू नये याकरिता त्याच्याशी सतत संवाद सुरू ठेवावा, अशा विद्यार्थ्यांचे तज्ज्ञांद्वारे समुपदेशन करावे. विद्यार्थ्याला शारीरिक अथवा मानसिक ईजा होईल, अशी शिक्षा शिक्षकांनी करू नये. यासारख्या उपाययोजना शाळेमध्ये राबविण्यात याव्यात, असेही डॉ.वासंती देशपांडे यांनी प्रतिपादित केले. कार्यशाळेसाठी शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे संचालन मधू पराड यांनी केले. आभार संध्या पवार यांनी मानले. यावेळी मनपाच्या शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.