वर्धा – वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी अचानक अंधत्वाला सामोरे जावे लागत असताना आशेचा एक किरण म्हणून दुर्गम भागातील ज्योती सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी येते आणि न्यूरोसर्जरी विभागात तिच्यावर शस्त्रक्रिया होऊन गमावलेली दृष्टी तिला परत प्राप्त होते. अर्थात आजच्या आधुनिक आयुर्विज्ञानामुळे व शल्यचिकित्सकांच्या ज्ञानामुळे हे शक्य झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील किनवटसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील बोधडी या लहानशा गावात राहणाऱ्या ज्योती बिज्जमवार (५०) या महिलेला अचानक डोकेदुखी, मळमळ आणि ओकारीचा त्रास सुरू झाला. त्यासोबतच अचानक डोळ्यांची दृष्टी लोप पावल्याने ज्योती आणि तिच्या कुटुंबातील सदस्य धास्तावले.
ज्योतीला उपचारांसाठी नांदेडमधील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता तिच्या डोक्यात गाठ असल्याचे निदान करण्यात आले. शहरात शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध नसल्याने तिला पुणे किंवा मुंबई येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. मेंदूतील गाठ काढण्याच्या शस्त्रक्रियेसाठी १० ते १५ लाख रुपये खर्चाची शक्यता असून दृष्टी परत येण्याची खात्रीही देता येत नसल्याचे सांगण्यात आले. नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखविले असता तेथेही शस्त्रक्रियेचा भरमसाठ खर्च ऐकून अखेर ज्योतीच्या परिवाराने आशा सोडून दिली.
अशा अवघड परिस्थितीत आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्यदूत कुंदन उदावन यांची रुग्णपरिवाराशी भेट झाली आणि या आरोग्यदूताने देवदूताची भूमिका बजावत सावंगी मेघे रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला. सावंगी रुग्णालयातील न्यूरो सर्जन डॉ. संदीप इरटवार यांनी पुन्हा सर्व तपासण्या करून घेतल्या. एमआयआर तपासणीत मेंदूत ट्युमर वाढल्याचे निदान झाले. या ट्युमरमुळे केवळ दृष्टीच गेली नव्हती तर तो वाढत असल्याने रुग्णाच्या जीवाला धोकाही निर्माण झाला होता. शस्त्रक्रियेद्वारे हा ट्युमर काढण्यासाठी परिवारातील सदस्यांची संमती मिळताच अल्पावधीत रुग्णावर ही अतिजोखिमेची शस्त्रक्रिया करून डॉ. इरटवार यांच्यासह डॉ. जितेंद्र ताडघरे, डॉ. प्रिन्स वर्मा, डॉ. वैभव ढवळी तसेच बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रौनक निसाळ यांनी उपचार पूर्णत्वाला नेले.
शस्त्रक्रियेनंतर भरती काळातच ज्योतीला हळूहळू दिसायला लागले. रुग्णाला सुटी देण्यात आली असून सद्यस्थितीत रुग्णाची दृष्टी पूर्ववत झाली असल्याने व जीवावरचा धोका टळल्याने बिज्जमवार परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे, असे डॉ. संदीप इरटवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून पूर्णतः मोफत झाली असून रुग्णाला कोणताही खर्च लागला नाही आणि जे महानगरातील मोठ्या रुग्णालयात झाले नाही, ते सावंगीसारख्या लहानशा खेडेवजा गावात शक्य झाले, असेही डॉ. इरटवार म्हणाले.